न्यायालयाच्या सुचनांचे उल्लंघन, परळीतील १२२ केंद्रांवर फेरमतदान घ्या: राजेसाहेब देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:53 PM2024-11-21T18:53:36+5:302024-11-21T18:55:08+5:30
न्यायालयाने सूचना देऊनही निवडणूक आयोगाने त्याचे पालन केले नाही; महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा आरोप
अंबाजोगाई -: परळी विधानसभा मतदार संघात १२२ बुथवर आराजकता व दहशतीने बोगस मतदान झाले. त्यामुळे या १२२ मतदान केंद्रावर फेर मतदान घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. अशी लेखी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
बुधवारी दिवसभर परळी विधानसभा मतदार संघात धर्मापुरी,जलालपुर,परळी शहरातील बँक कॉलनी येथे बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप स्वतः मी उमेदवार म्हणून घेतला. अशीच स्थिती मतदार संघातील १२२ संवेदनशील मतदार केंद्रांवर आहे. उच्च न्यायालयाने या १२२ मतदान केंद्रांवर सीआरपीएफ बंदोबस्तात व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी सूचना केली होती. निवडणूक आयोगाने तसे शपथपत्र ही दिले. मात्र अंमलबजावणी केली नाही. परिणामी दहशत व गुंडागर्दी करत बोगस मतदानाची प्रक्रिया धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविण्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
याउलट न्यायालयात याचिका दाखल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते ॲड. माधव जाधव यांना न्यायालयात का गेलात या कारणावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा सर्व प्रकार पोलीस यंत्रनेसमोर होऊनही अद्यापपर्यंत कसलाही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही. घाटनांदुर व परिसरात मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनीच मतदान केंद्रावर धुडगूस घातला. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंदविले, असा आरोप करत या घटनेचा निषेध ही देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच या १२२ केंद्रांवर फेर मतदान घेण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते ॲड. माधव जाधव, नेत्या सुदामती गुट्टे उपस्थित होत्या.
पोलीस अधीक्षकांची भेट घेऊनही गुन्हा नोंद झाला नाही: ॲड. माधव जाधव
मतदार संघातील १२२ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.इथे सिआरपीएफ बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी आपण उच्च न्यायालयात केली होती. मात्र याची दखल घेतली नाही. उलट मलाच न्यायालयात का गेलास? म्हणून धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मतदान केंद्र परिसरात जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार पोलिसांसमोर होऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. तरीही गुन्हा नोंद झाला नाही. त्यामुळे गुरुवारी आपण मुख्यमंत्री,गृहमंत्री व पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते ॲड.माधव जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.