स्वच्छतेच्या ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:20+5:302021-05-17T04:32:20+5:30
माजलगाव : येथील नगरपालिकेने सहा महिन्यांपूर्वी स्वच्छतेचे टेंडर दिले होते. संबंधित टेंडर धारकाने सर्व नियम धाब्यावर बसवत घंटागाडीचा वापर ...
माजलगाव
: येथील नगरपालिकेने सहा महिन्यांपूर्वी स्वच्छतेचे टेंडर दिले होते. संबंधित टेंडर धारकाने सर्व नियम धाब्यावर बसवत घंटागाडीचा वापर करण्याऐवजी चक्क छोटा हत्ती व इतर रिक्षातून हा कचरा उचलण्यात येत आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्र नेण्याऐवजी एकत्रच घेऊन जात असल्याने घाण पाणी रस्त्यावरच सांडून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. मात्र, नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सहा महिन्यांपूर्वी नगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी काम करत नसल्याने शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे त्यावेळच्या नगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांनी स्वच्छतेचे टेंडर काढून शहर स्वच्छतेचा निर्णय घेतला होता. शहरातील नाल्या सफाई करणे, कचरा उचलणे , शहरातील झाडझूड करणे , कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी या टेंडरमध्ये करण्यासाठी वर्षाला नगरपालिकेला जवळपास पावणेदोन कोटी रुपये खर्च येतो. संबंधित गुत्तेदाराने सुरुवाला २-३ महिने सुरळीतपणे काम केले. कचरा उचलण्यासाठी व गोळा करण्यासाठी नगरपालिकेच्या घंटागाड्या वापरल्या होत्या. या गाड्याला एका बाजूने ओला तर दुसऱ्या बाजूला सुका कचरा टाकण्याची सोय होती. अशाच प्रकारे कचरा उचलण्याचा नियम संबंधित टेंडर धारकास घालून दिलेला होता. मात्र संबंधित गुत्तेदाराने नगरपालिकेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी व स्वच्छता अभियंत्यांना हाताशी धरून नगरपालिकेच्या गाड्या परवडत नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे जुने झालेले छोटाहत्ती व इतर रिक्षाच्या माध्यमातून कचरा गोळा केला जात आहे. तर नाल्या काढल्यानंतर जो कचरा ट्रॅक्टरद्वारे उचलण्यात येत आहे तो ट्रॅक्टरच्या मागील बाजूचा दरवाजा तुटल्याने व यात जास्त कचरा भरल्याने वाहतुकीदरम्यान निम्मा कचरा पुन्हा रस्त्यावर सांडतो. हा कचरा अशा रिक्षामध्ये उचलला जात असल्याने ओल्या कचऱ्याचे घाण पाणी रिक्षातून खाली गळत असल्याने शहरात स्वच्छता होण्याऐवजी जागोजागी दुर्गंधी पसरलेली दिसत आहे. यामुळे नगरपालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात असल्याचा आरोप नागरिकांतून वारंवार होताना दिसत आहे. संबंधित टेंडर धारकाची मनमानी सुरू असताना नगराध्यक्ष ,मुख्याधिकारी ,नगरसेवक हे केवळ बघ्यांची भूमिका घेताना दिसत आहेत. ते याबाबत बोलायला देखील तयार नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर हे काम नगराध्यक्ष , मुख्याधिकारी , नगरसेवक आदींना हाताशी धरून संबंधित टेंडर धारक आपले उखळ पांढरे करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
बिल थांबवणार
संबंधित टेंडर धारकाकडून कचरा संकलन करताना नियमांची पायमल्ली होत असल्याने त्यास अटींची पूर्तता केल्याशिवाय यापुढील बिल देण्यात येणार नाही.
--- शेख मंजूर, नगराध्यक्ष
===Photopath===
160521\purusttam karva_img-20210516-wa0048_14.jpg~160521\purusttam karva_img-20210516-wa0047_14.jpg