झापेवाडीच्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:36 PM2019-11-27T23:36:31+5:302019-11-27T23:37:05+5:30
बीड - शिरूर रस्त्यावर येळंब बावी फाट्यावर झापेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेला पैसे देण्याघेण्यावरुन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
शिरुर कासार : बीड - शिरूर रस्त्यावर येळंब बावी फाट्यावर झापेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेला पैसे देण्याघेण्यावरुन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच तिच्या हाताला धरुन बळजबरीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन शिरुर ठाण्यात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झापेवाडी येथील ३५ वर्षीय महिला येळंब फाट्यावर उभी असताना दादा उमा राऊत हा दुचाकीवरुन तेथे आला. तुझ्या नवऱ्याला माझ्याकडून घेतलेले उसने पैसे देण्याचे सांग. यावर सदर महिलेने तुमच्या देण्याघेण्यात माझा संबंध नाही. तुम्ही तुमचे पाहून घ्या, असे म्हणताच दादा राऊत याने बळजबरीने महिलेचा हात धरुन माझ्या गाडीवर बस असा आग्रह धरला. तसेच महिलेस जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिल्यावरुन मंगळवारी शिरुर ठाण्यात कलम ३२३, ५०४, ३५४ भादंवि तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१) डब्ल्यू (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे अधिक तपास करीत आहेत.