विष्णू भागवतला दहा दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:39+5:302021-02-10T04:34:39+5:30
परळी : परळी येथील माउली मल्टीस्टेटच्या माध्यमातून जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये हडपल्याप्रकरणी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा ...
परळी : परळी येथील माउली मल्टीस्टेटच्या माध्यमातून जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये हडपल्याप्रकरणी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू भागवत याला ८ फेब्रुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. भागवत याला अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता, दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
परळी येथील माउली मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या पतसंस्थेत पैसे गुंतवले होते. मात्र, मुदत ठेवीची मुदत संपूनदेखील व्याज व मुद्दल परत देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, २०१९ मध्ये पतसंस्था बंद पडली, ठेवीदारांनी मल्टीस्टेटच्या पदाधिकाऱ्यांना व्याज व मुद्दल परत मिळावी यासाठी संपर्क केला. मात्र, पैसे देण्यास पदाधिकाऱ्यांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे ठेवीदार अरुण मुळे (रा. नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांच्यासह एकूण १४ ठेवीदारांनी परळी शहर ठाण्यात एक कोटी २८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन ओमनारायण जैस्वाल, सचिव संगीता ओमनारायण जैस्वाल आणि विष्णू रामचंद्र भागवत (रा. वंडगाव, ता. येवला, जि. नाशिक) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास बीड आर्थिक गुन्हे शाखा करत होती. आर्थिक गुन्हे शाखेने चेअरमन ओमनारायण जैस्वाल याला वाळूज येथील फ्लॅटमधून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून, संगीता जैस्वाल फरार आहे. दरम्यान, तिसरा आरोपी विष्णू भागवत हा नाशिक कारागृहात होता. त्याला सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून तपासकामी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी भागवत याला पुढील तपासासाठी परळी पोलीस ठाण्याच्य ताब्यात दिले आहे. पुढील तपास परळी पोलीस करत आहेत.
पतसंस्थांचे गुन्हे होणार उघड
जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेच्या संचालक मंडळांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा गुन्ह्यांचा तपास युद्ध पातळीवर करण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जात आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित गुन्हे मार्गी लागणार आहेत. या कारवायांमुळे ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.