विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:15 IST2024-07-06T11:48:30+5:302024-07-06T13:15:47+5:30
खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू
धारूर (बीड) : खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर शुक्रवारी रात्री भरधाव वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला जोरदार धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने अपघातात गंभीर जखमी वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड ( रा. लाडनांद्रा, ता. सेलू) असे मृताचे नाव आहे.
सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी यंदाही बुधवार रोजी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. दिंडी शुक्रवारी ( दि.५ ) सायंकाळी तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती. रात्री दिंडीतील एक वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिली. या अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश साळुंके, बालाजी सुरेवाड आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान, धडकेनंतर चालकाने वाहन न थांबवता तसेच पुढे नेले. वाहनाबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.