‘विठ्ठलाचा भार आता या विटेला वाटतो !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:26 PM2017-12-25T23:26:21+5:302017-12-25T23:26:39+5:30
मल्हारीकांत देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला ...
मल्हारीकांत देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : भगवानराव लोमटे सभागृहात डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझल संमेलनाला युवा महोत्सवाचेच स्वरूप प्राप्त झाले होते. सळसळती तरुणाई व दर्जेदार झालेले सादरीकरण यामुळे गझलनगरीत पाय ठेवायला जागा राहिली नव्हती. रसिकांची गर्दी खेचणारा कार्यक्रम म्हणून या संमेलनाने नोंद घ्यावी, अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाली होती. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच मराठी गझलला व्यासपीठ मिळाल्यामुळे तरुण गझलकारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. श्रोत्यांमध्ये तरुणींसह महिलांची उपस्थिती व सहभाग हे या गझल संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
लातूर येथील प्रा. संतोष कुलकर्णी यांची
‘मराठी गझल पुढे जात आहे,
मराठीसही ती पुढे नेते आहे’
गझलेला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दास पाटील, योगिता पाटील यांच्याही गझला उत्तम होत्या. नांदेड येथील प्रफुल्ल कुलकर्णी यांनी
‘मोठ्याला मोठे म्हणण्याला धीर हवा
गुन्हा नको, आरोप तरी गंभीर हवा’
हा शेर सादर करीत दाद मिळविली. सुहासिनी देशमुख यांनी
‘तुझ्या भोवती खुळा पाश आहे
क्षणाचा विसावा पुन्हा नाश आहे
नको दोन डगरींवर पाय आता
अशा वागण्यात पुरा नाश आहे...’
ही गझल सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
सेलू येथील संजय विटेकरांनी,
‘वयाने जरासा ढळू लागलो
तसा मी मला कळू लागलो...’
ही गझल सादर केली. उदगीर येथील शिव डोईजोडे या युवकाने
ती डोळ्याने बोलत गेली
मी नंतर भाषांतर केले
रंगत आली कथा नेमकी
उगीच का मध्यंतर झाले...
म्हणताच उपस्थित युवांनी जल्लोष केला.
कळंब येथील सचिन क्षीरसागर यांनी
‘युगायुगांचा त्रास हा
टिपेला गेला वाटतो
विठ्ठलाचा भार या विटेला वाटतो’
ही मार्मिक गझल ऐकवली.
प्रा. शेखर गिरी यांनी,
दाबून तोंड माझे, पाठीत वार झाला
मजला छळावयाचा
ऐसा प्रकार झाला
माझी तशी सुपारी
कोणीच घेत नव्हते
माझाच दोस्त साला
तेव्हा तयार झाला’
अशी कोटी सादर केली.
उस्मानाबाद येथील बाळ पाटील या युवकाच्या
‘हसू वाटते, पण हसू देत नाही
जखम ही ‘मुळाची’ बसू देत नाही
सदा काश्मिराचा नकाशा मुखावर
कधी तो खुशाली असू देत नाही’
या व्यंगात्मक गझलेने उपस्थितांची हसून हसून मुरकुंडी उडाली
नांदेड येथील अरविंद सगर या युवकाने,
‘गळी लागला तो विषारी निघाला
तिचा चेहराही शिकारी निघाला
आता माकडाचे बघून सर्व चाळे
दिली ज्या सत्ता, तो मदारी निघाला’
हे राजकीय व्यंग गझलेतून मांडले.
रवींद्र केसकर या गझलकाराने
‘कोणी गुलाम झाला,
कोणी ‘आमिर’ झाला
ज्याला न जात काही,
तो कबीर झाला’
असे सामाजिक आशयाचे शेर सादर केले.
बडवणी येथील सतीश दराडे यांनी,
आतल्या कोलाहलाला,
बांग देता येत नाही
गाढ निद्रेतून हल्ली,
जाग येता येत नाही’
अशी गझल सादर केली.
वैभव देशमुख या युवकाने,
‘संबंध कधी मी आपला,
कुणाला सांगत नाही
गंध तुझ्या प्रेमाचा,
या उरात मावत नाही
सूर्याभोवती फिरती ही धरा,
किती युगांची
हा सूर्य मिठी एखादी
का देऊन टाकीत नाही’
अशी शृंगारिक रचना सादर केली.
राज पठाण, प्रथमेश तुगावकर, विजय आव्हाड, योगीराज माने यांच्या गझलांना उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
गझल संमेलनाची सांगता औरंगाबाद येथील डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या
‘बोलतो मराठी, ऐकतो मराठी
हीच माय माझी, मानतो मराठी
जन्मलो येथे मी भारतीय मुस्लिम
रोज रोज मी दुवाही मागतो मराठी’
या गझलेने कार्यक्रमाची सांगता झाली.
सचिन क्षीरसागर ठरला हिरो
कळंब येथील अल्पशिक्षित सचिन क्षीरसागर हा युवक उदरनिर्वाहासाठी पानटपरी चालवितो. या युवकाचे सादरीकरण उपस्थितांना मनोमन भावले. राजकीय व्यंग टिपताना तो म्हणतो,
चालते फुरफुर कुणाची, तर कुणी खिंकाळतो
संसदेचा हॉल आज घोड्याचा तबेला वाटतो
जातिधर्माचे वाढतो स्तोम व्यक्त करताना त्याच्या ओळी लक्षणीय होत्या...
लटकतो खोपा कुठे, कुठे हिरवा कुठे भगवा, निळा
पाखरांनी आज जातीवाद केला वाटतो’
सचिनच्या प्रभावी सादरीकरणामुळे तो गझल संमेलनाचा ‘हिरो’ ठरला.