निर्भीडपणे मतदान करा, बीड पोलीस सुरक्षेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:34 PM2019-10-11T23:34:44+5:302019-10-11T23:35:26+5:30
मतदारांनी कोणत्याही अमिषाला व भितीला बळी न पडता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे.
बीड : जिल्ह्यातील निवडणूक ही संपुर्ण राज्यात चर्चेचा विषय असतो. तसेच सर्व मतदारसंघात मातब्बर नेत्यांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही अमिषाला व भितीला बळी न पडता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे. असा संदेश देणाऱ्या ‘आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष’ या लघुपटाची निर्मिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. यामध्ये सर्व कलाकार हे बीड तालुक्यातील ताडसोन्ना या गावातील आहेत हे विशेष.
शुक्रवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. हर्ष पोद्दार म्हणाले नागरिकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याच्यासंदर्भात जनजागृती व्हावी, तसेच या कालावधीमध्ये जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास नागरिकांमध्ये यावा हा या लघुपटाचा उद्देश आहे. हा लघुपट सर्व सोशल मिडिया व इतर माध्यमामधून नागरिकांपर्यंत पोहचवला जाणार आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन मुंबई येथील आरती बागडी यांनी केले. तर लेखक वर्षा खरीदहा यांनी केले. चित्रपटाचा मराठीत संवाद अंशुमन जोशी, निर्मिती दिपेश टँक, छायाचित्रण इर्शाद शेख, संकलन व रंगकर्मी गणेश सपकाळ, संगीत अमित दसानी, ध्वनी संकलन विजय कोचाले, आवाज रचना रमिझ जुबेर, सहाय्यक दिगदर्शक प्रणय कोतवाल व प्रदीप कोरे, सहा.छाया विशाल भागवत, ड्रोन आॅपरेटर अमोल ससाने, आवाज अर्थव शेळके, ताडसोन्ना व बीड येथील स्थानिक कलाकार सोहम सवई, दिपाली रुईकर, रंजित वाघमारे, महादेव सवई, पोलीस कर्मचारी अनिल शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी भूमिका केली आहे. या लघुपटामुळे नागरिकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याचे बळ येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केला.
ताडसोन्ना हे गाव तंटा मुक्ती व आदर्श गाव आहे. यापुर्वी देखील पोलीस दलाच्या वतीने या गावामध्ये नदी खोलीकरण व रूंदीकरण हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्यामुळे या गावाची निवड या लघुपटासाठी केली असल्याचे पोद्दार म्हणाले. दरम्यान प्रसिद्ध दिगदर्शक सुभाष घई यांनी सोशल मिडीयावर या लघुपटाची प्रशंसा केली आहे.
चित्रपटगृहांमध्ये दाखवणार लघुपट
हा जनजागृतीपर लघुपट असून याचा प्रसार सर्व माध्यमांमधून केला जाणार आहे. तसेच शहरी मतदारांमपर्यंत पोहचण्यासाठी चित्रपटगृहांचा देखील समावेश केला आहे. चित्रपट सुरु होण्यापुर्वी हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.