मतदारराजा आज देणार महाकौल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:35 PM2019-10-20T23:35:00+5:302019-10-20T23:35:54+5:30
बीड : बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, परळी, आष्टी, केज आणि माजलगाव अशा सहा विधानसभा मतदारसंघासाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान ...
बीड : बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, परळी, आष्टी, केज आणि माजलगाव अशा सहा विधानसभा मतदारसंघासाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. या सहा विधानसभा मतदार संघातील २० लाख ५६ हजार ८६० मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात १० लाख ८६ हजार८१८ पुरुष, तर ९ लाख ७० हजार ३७ महिला आणि ५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १८ लाख ३२ हजार १५६ मतदार संख्या होती. ३१ आॅगस्ट २०१९ नुसार एकूण २० लाख ५५ हजार १६८ मतदारांची नोंद झाली होती. या सहा मतदार संघात मिळून एकूण ११५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण २३२१ मतदान केंद्रे असून सर्वात जास्त ४३८ आष्टीमध्ये तर सर्वात कमी ३३५ परळीत आहेत.
कडेकोट बंदोबस्त
२०१० स्थानिक पोलीस, २५०५ होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या झारखंड, महाराष्टÑातून आल्या आहेत. लातूर, नाशिक, जिल्ह्यातून पोलीस बळ मागविण्यात आले आहे. त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविल्या.
जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.
कुठे काही गडबड झाली तर काय ?
कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआरपीएफ कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाºयावर कडक कारवाई करेल. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत एसपी (पोलीस अधीक्षक) ते पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.
मतदारांसाठी २३२१ व्हीव्हीपॅट
विधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच २३२१ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?
ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७६८ व्हीव्हीपॅट, ६२५ कंट्रोल युनिट तर ९६२ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. झोनल आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.
मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का?
सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाºयांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अपर कामगार आयुक्तांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, बँक, पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आधार कार्ड