वडवणी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:41+5:302021-01-20T04:33:41+5:30
वडवणी : नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील आणि कार्यालयातील स्थापत्य अभियंता यांच्यात कार्यालय कामकाजातून किरकोळ वाद झाला. या वादातून ...
वडवणी : नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील आणि कार्यालयातील स्थापत्य अभियंता यांच्यात कार्यालय कामकाजातून किरकोळ वाद झाला. या वादातून पाटील यांना अभियंत्याचे वडील व मामांनी जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी घडली आहे.
नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील हे कार्यालय कामकाज आटोपून निघाले असता त्यांच्यावर कार्यालय परिसरात मंगळवार रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास स्थापत्य अभियंता सुमितकुमार मेटे यांच्या नातेवाईकांनी अचानक हल्ला केला. किरकोळ कारणावरून चाकू, लोखंडी राॅडने जबर मारहाण केली. यामध्ये मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या उजव्या हाताला गंभीर जखम झाली असून मांडीवर व अंगावर मुकामार दिला आहे. मुख्याधिकारी लगेच पोलीस ठाण्यात पोहचले व मेडिकलसाठी प्रा. आ. केंद्र वडवणी येथे रेफर करण्यात आले आहे. अभियंता सुमित मेटे यांच्या सांगण्यावरून सुनील लक्ष्मण कदम, दिलीप मेटे यांनी मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नगरपंचायत कार्यालयासमोर मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी धाव घेतली. मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आरोपी ताब्यात घेतले आहेत. मनस्थिती बरोबर नाही असे सांगत मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.