बिल न देता कारमधून पळून जाणाऱ्या तिघांनी वेटरला फरफटत नेले, रात्रभर ठेवले ओलिस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:04 PM2024-09-09T17:04:30+5:302024-09-09T17:05:59+5:30
संतापजनक! जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून वेटरचे अपहरण; भरधाव गाडीत एक किलोमीटरपर्यंत नेले फरफटत
दिंद्रुड (बीड) : तीन मित्रांनी हॉटेलवर जेवण केले, वेटरला बिल ऑनलाइन देतो स्कॅनर घेऊन ये म्हणत गाडीत जाऊन बसले. त्यानंतर बिलाची मागणी करत गाडीजवळ आलेल्या वेटरला, बिल देण्यास नकार देत एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. ऐवढेच नाहीतर त्यांनी वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले. ही घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, दिंद्रुड पोलीस हद्दीतील मेहकर- पंढरपूर या पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेल मध्ये सखाराम जनार्दन मुंडे व अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी तेथे येथेच्छ जेवण केले. त्यानंतर वेटर शेख साहिल अनुसूद्दीन ला बिल घेऊन ये असं सांगितले. वेटरने बिल दिल्यानंतर, फोन पेचे स्कॅनर घेऊन ये म्हणत तिघेजण गाडीत जाऊन बसले. वेटर स्कॅनर घेऊन गेला असता, कशाचे बिल म्हणत तिघांनी वाद घातला. तू आम्हाला बिल का मागतोस का? म्हणत चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. निर्जन ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी मारहाण करत वेटरच्या खिशातील ११ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले. दरम्यान रविवारी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले.
जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून वेटरचे अपहरण; भरधाव गाडीत एक किलोमीटरपर्यंत नेले फरफटत #beednews#crimenewspic.twitter.com/cT4CgwFcRm
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 9, 2024
याप्रकरणी शेख साहिल अनुसूद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून, सखाराम जनार्दन मुंडे (रा. भाईजळी ता.धारूर) व अन्य अनोळखी दोघांच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अन्वये 140 (3), 119 (1),115 (2), 351 (2),351 (3),281, 125 (ए),3 नुसार दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड करत आहेत.