वडवणीकरांना शासकीय विश्रामगृहाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:36+5:302020-12-31T04:32:36+5:30
वडवणी तालुक्याची निर्मिती होऊन जवळपास वीस वर्षे झाली. मात्र, आजही वडवणी शहरात सुविधांचा मोठा अभाव आहे. शहरात अद्यापही शासकीय ...
वडवणी तालुक्याची निर्मिती होऊन जवळपास वीस वर्षे झाली. मात्र, आजही वडवणी शहरात सुविधांचा मोठा अभाव आहे. शहरात अद्यापही शासकीय विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली नाही. परिणामी शासकीय दौऱ्यावर आलेल्या अधिकारी, लोकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
तालुक्याचे ठिकाण म्हटले की, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांचे नेहमीच दौरे असतात. यावेळी त्यांचा काही वेळ राखीव ठेवलेला असतो. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांना खासगी लाॅज किंवा कार्यकर्ते यांचे निवासस्थान येथे थांबावे लागते. परंतु, तालुक्याचे ठिकाण असतानाही शहरात शासकीय विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे शहरात शासकीय विश्रामगृहाची निर्मिती करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी केली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. आय.सय्यद म्हणाले की, शासकीय विश्रामगृहासाठी जागा उपलब्ध नाही, जागेचा शोध सुरू आहे. जागा उपलब्ध होताच विश्रामगृहाचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.