बीडमध्ये सहा हजार क्विंटल उडीद मापाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:58 AM2017-12-15T00:58:05+5:302017-12-15T01:01:46+5:30
१३ डिसेंबरपर्यंत उडीद खरेदी करण्याबाबत नाफेडचे आदेश असल्याने तसेच शेवटच्या दोन दिवसात हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांची गर्दी झाल्यानंतर केवळ काही हमाल व चाळणा कामगारांनी आडमुठी भूमिका घेतल्याने बुधवारी गोंधळ उडाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : १३ डिसेंबरपर्यंत उडीद खरेदी करण्याबाबत नाफेडचे आदेश असल्याने तसेच शेवटच्या दोन दिवसात हमीभाव खरेदी केंद्रावर शेतक-यांची गर्दी झाल्यानंतर केवळ काही हमाल व चाळणा कामगारांनी आडमुठी भूमिका घेतल्याने बुधवारी गोंधळ उडाला.
दरम्यान, गुरुवारी आॅनलाईन नोंदणी केलेल्या व एसएमएस मिळालेल्या शेतकºयांच्या उडदाची खरेदी सुरु होती. या वेळी ग्रेडरकडून योग्य प्रतवारी होत नसल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या. तर चाळणा आणि वजनानंतर मोठ्या प्रमाणात मनमानीपणे मात्रा काढण्यात येत असल्याने शेतकरी पुन्हा संतापले होते. जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १७ हजार ९८४ क्विंटल उडीदाची खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या वर्षी नाफेडच्या केंद्रांवर हमीभावाने माल विकणा-या शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक केली होती. ३ आॅक्टोबरपासून नोंदणी तर १३ पासून खरेदी सुरु झाली. १३ डिसेंबरपर्यंत उडीद खरेदीचे निर्देश होते. त्यामुळे गोंधळ उडाला.
दरम्यान, उडीद खरेदी केंद्रावरील शेतक-यांची लूट थांबवावी अशी मागणी भाकपने केली आहे. गुरुवारी ज्योतीराम हुरकुडे, उत्तमराव सानप, भाऊराव प्रभाळे, विनोद सवासे, पंकज चव्हाण, रामहरी मोरे, माणिक शेलार, नवनाथ वक्ते यांनी खरेदी केंद्रावर भेट दिली. शेतक-यांची बाजू मांडली. त्यानंतर सर्व उडीद नाफेडने खरेदी करावा व इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना दिले.
नियोजनाचा अभाव
जिल्हा कृषी औद्योगिक सर्वसेवा सहकारी संस्था नाफेडने खरेदीसाठी एजन्सी नेमली आहे. मात्र, खरेदी प्रक्रियेतील त्रुटी येथे दिसून आल्या. बारदाना, सुतळीचे नियोजन नव्हते. ते वेळेवर उपलब्ध नसल्याने खरेदी केलेले उडीद ठेवायचे कोठे असा प्रश्न होता.
अखेर गुरुवारी २० गाठी बारदाना उपलब्ध झाला असून, दहा हजार क्विंटल मालासाठी पुरेल असे संस्थेचे व्ही. एम. खांडे यांनी सांगितले. येथे शेतक-यांकडून कोणताही त्रास झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील नाही अशी तक्रार काही शेतकºयांनी केली. पाण्याचे चार जार हमालांनी लपवून ठेवल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ग्रेडरची मनमानी, शेतक-यांचा आरोप
हमीभाव केंद्रावर माल खरेदी करण्याबाबत नाफेडच्या सुचना आहेत. त्यामुळे या निकषांचा आधार घेत चांगला दर्जा असतानाही ग्रेडर माल रिजेक्ट करत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या. त्यावेळी आर्द्रता, पांढरा, भूरका उडीद घेता येणार नाही. नाफेडकडून गाड्या परत येतात असे उत्तर मार्केटिंग फेडरेशनच्या अधिका-यांनी दिले.
उडीद रिजेक्ट कसे काय?
हमीभाव खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकºयांच्या मालाची ग्रेडर तपासणी करत होते. पाली येथील ऋषीकेश चाळक यांनी पाच पोते उडीद आणले होते. त्यांचे एक पोते पात्र ठरविले तर चार पोते रिजेक्ट केले. हातात उडीद घेऊन हे उडीद रिजेक्ट कसे काय? असा सवाल ते करत होते. या मालात ओलसरपणा असल्याचे ग्रेडरचे म्हणणे होते.
कामगारांमुळेच गोंधळ
बुधवारी झालेल्या गोंधळाशी शेतकरी व कर्मचाºयांचा काहीही संबंध नव्हता. भवानवाडी येथील काशीनाथ जगताप म्हणाले, मापाडी, चाळणा करणारे व हमालांच्या गटात भांडण झाले. नंतर बारदाना देण्यास टाळाटाळ करुन चाळणा फेकून दिले आणि शेतक-यांवर खापर फोडल्याचे ते म्हणाले. १२ तारखेपासून १४ पर्यंत आपण थांबले असून अद्याप माप झाले नसल्याचे हिवरशिंगाचे शेतकरी मुरलीधर सानप म्हणाले.
1000 शेतकरी वंचित
आॅनलाईन नोंदणीसाठी आवाहन केल्यानंतर शेतकºयांनी सातबारा, आधारकार्ड, पीकपेरा, बॅँकेच्या पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे रितसर दिली होती. त्याची पोचपावती मिळाली नाही तसेच नोंदणीदेखील झाली नाही. असे जवळपास एक हजार शेतकरी असल्याचे सूत्रांनी सांगितले.