४८ तासात उभारलेला कोविड सेंटरला ऑक्सिजनची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:49+5:302021-05-01T04:32:49+5:30
परळी : येथील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर मागील आठवड्यात गुरुवारी ४८ तासात ...
परळी : येथील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर मागील आठवड्यात गुरुवारी ४८ तासात आरोग्य प्रशासनाने उभारले. मात्र सात दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे सेंटर सुरु झाले नव्हते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन होत नसल्याने परळी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर प्रशासनास सुरू करता आले नसल्याचे समजते.
तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील उपजिल्हा रूग्णालयात ५० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर ४८ तासात ते उभारण्यात आले. मात्र ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन होत नसल्याने कोविड केअर सेंटर सुरू करता आले नाही.
परळी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना गंभीर स्वरूपाचा कोरोना झाला तर अंबाजोगाई सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. पण परळी उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर उभारले असूनही ते गंभीर कोविड रुग्णांसाठी का चालवले जात नाही ? असा प्रश्न येथील सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी उपस्थित केला आहे. डॉक्टर, नर्स व इतर सर्व सोईसुविधा युक्त असलेले येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये मंजुर झालेले कोविड केअर सेंटर कोविड रुग्णांसाठी चालू केले तर खाजगी दवाखान्यातील महागडे उपचार न परवडणाऱ्या परळी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना इथेच त्वरित उपचार मिळतील.
तसेच तंत्रज्ञ उपलब्ध असणाऱ्या या उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन सुरू केली तर खिशाला खर्च न परवडणाऱ्या प्रत्येक रुग्णांचे ३-४ हजार रुपयेही वाचतील असे मत व्यक्त करून अश्विन मोगरकर यांनी
परळीत उपजिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी मंजूर कोविड उपचार केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे.
परळी उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. ते सुरू करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत.ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन झाल्यास सेंटर सुरू करण्यात येईल -डॉ. अर्शद शेख प्रभारी ,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी.