महसूल अधिकाऱ्यांची वानवा, कामकाजावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:31+5:302021-09-21T04:37:31+5:30
बीड : जिल्ह्यामध्ये महसूल यंत्रणेतील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी पदाची चार, तहसीलदारांची पाच पदे रिक्त आहेत. इतर ...
बीड : जिल्ह्यामध्ये महसूल यंत्रणेतील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी पदाची चार, तहसीलदारांची पाच पदे रिक्त आहेत. इतर विभागातदेखील अशाच स्वरूपाची परिस्थिती असल्याचे चित्र आहे. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनतेच्या कामांचा खोळंबा होत असून, ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात देवस्थान जमिनीच्या प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव वादग्रस्त ठरले होते. अधिकार नसताना देवस्थान जमिनी विक्री परवानगी देण्यात आल्याने हजारो हेक्टर जमीन भूमाफियांच्या घशात गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच प्रकाश आघाव यांचे निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे पाच दिवसांपूर्वीच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आघाव यांची बदली करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना पाठविला होता. त्यानुसार त्यांची बदली झाली आहे, तर निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांची हिंगोली येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. माजलगाव येथे बाफना यांची उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजलगावच्या वादग्रस्त तहसीलदार वैशाली पाटील यांना शेती महामंडळात बदली झाली आहे. तसेच पाटोदा तहसीलदार मुंडलोड यांचीदेखील बदली झाली असून, या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या सर्व बदल्यांमुळे जिल्ह्यातील कामकाजावर मोठा परिणाम होत असून, लवकरात लवकर ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
उपजिल्हाधिकारी रिक्त पदे
उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रशासन, पुरवठा अधिकारी, भूसंपादन जाप्र ४ अंबाजोगाई ही पाच पदे रिक्त असून, इतर उपजिल्हधिकाऱ्यांवर अतिरिक्त पदभार असल्यामुळे याचा परिणाम कामकाजावर होत आहे.
१५ पैकी पाच तहसीलदार पदे रिक्त
जिल्ह्यात ११ तालुके व इतर असे १५ तहसीलदार पदे आहेत. त्यापैकी माजलगाव तहसीलदार, पाटोदा तहसीलदार व वडवणी तहलीदार, सहायक जिल्हापुरवठा अधिकारी, तहसीलदार सर्वसाधारण १, ही ५ पदे रिक्त आहेत
रिक्तर पदांमुळे कामकाजावर परिणाम
महसूलसह इतर विभागांतदेखील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे याचा परिणाम कामकाजावर होत असून, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यासंदर्भात वेळोवेळी पदे भरण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात आल्यानंतरदेखील जवळपास दोन वर्षांपासून रोहयो व पुरवठा अधिकारी ही पदे रिक्त आहेत. पदे भरण्यासंदर्भात पाठपुरवठा सुरू असून, लवकरच सर्व जागा भरल्या जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
200921\20_2_bed_11_20092021_14.jpg
जिल्हाधिकारी कार्यालय बीड