पाच राज्यात 'वॉन्टेड' असलेला कुख्यात गुंड परळीत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:51 PM2019-06-28T15:51:15+5:302019-06-28T15:54:49+5:30
आरोपीवर महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत.
परळी (बीड ) : लुटमार, चोरी, फसवणुक व चैन स्नॅचींग अशा गुन्हयात पाच राज्यातून फरार असलेला कुख्यात गुंड इरफान खॉन शरीफ खॉन (३२, रा. परळी) यास दाऊतपूरच्या नविन औष्णिक विद्युत केंद्राजवळील सेलू झोपडपट्टीत संभाजीनगर व परळी शहर पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी (दि. २८ )पहाटे अटक केली. आरोपीवर महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत.
परळी शहरातील इराणी वस्तीमध्ये राहणारा फरार आरोपी इरफान खॉन शरीफ खॉन हा बाहेरील जिल्ह्यात व राज्यात लुटमार, चोरी व फसवणुक व चैन स्नॅचींग सारख्या गुन्ह्यात फरार होता. तसेच येथील संभाजीनगर पोलिस स्टेशन व परळी शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व जातीवाचक शिवीगाळ करणेचा गुन्हा दाखल होता. तो अनेक वर्षापासुन फरार असल्याने येथील इराणी वस्ती मध्ये त्यास पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी अनेकवेळा केला. परंतु तो हुलकावणी देत असत.
गुरुवारी इरफान नविन औष्णिक विद्युत केंद्राजवळील सेलू येथील झोपडपट्टीमध्ये असलेल्याची माहिती डीबी पथक प्रमुख रमेश सिरसाट यांना मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी आरोपीस पकडण्यासाठी एक पथक तयार केले. अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे यांचे या कामी मार्गदर्शन घेण्यात आले. संभाजीनगर आणि परळी शहरचे डी.बी.पथक सेलूच्या झोपडपट्टीत गेले. याठिकाणी चारही बाजुने घेराव करत इरफानच्या मुसक्या आवळल्या.
अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे, संभाजीनगर पोलिस ठाण्याचे परळीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने, संभाजीनगर डी.बी.पथक प्रमुख रमेश सिरसाट, दत्ता गित्ते, सविता दहिवाळ, मोहन दुर्गे, परळी शहरचे डी.बी.प्रमुख बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड यांनी आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास सपोनि सलीम पठाण हे करीत आहेत.