दर्ग्याच्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविण्याचे ‘वक्फ’चे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:11+5:302021-01-25T04:34:11+5:30
केज : शहरातील हजरत खाजा मोहजबोद्दीन दर्ग्याच्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्याचे आदेश जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिले आहेत. शहरातील ...
केज : शहरातील हजरत खाजा मोहजबोद्दीन दर्ग्याच्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्याचे आदेश जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिले आहेत. शहरातील हजरत काजी खाजा मोहजबोद्दीन (रहे) दर्ग्याच्या नावे केज शहरात सर्व्हे नंबर ४८६ मध्ये १ हेक्टर ६३ आर. जमीन आहे. ही जमीन दर्ग्याच्या व्यवस्थापनासाठी महंमद आयुब अ. कादर खुरेशी यांना दिली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुतण्या मुस्तफा अ. वहाब खुरेशी यांनी या जमिनीमध्ये प्लॉटिंग पाडून त्याची विक्री करण्यास सुरुवात केल्याची तक्रार मुस्लिम समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष नोरमियां इनामदार यांनी जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी तसेच औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा वक्फ बोर्ड अधिकाऱ्यांनी केज शहरातील हजरत काजी मोहजबोद्दीन दर्ग्याच्या मालकीच्या सर्व्हे नं. ४८६ मधील मिळकत ही संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश झाल्याचे नमूद करीत या बेकायदेशीर कृत्याबद्दल वक्फ संशोधन अधिनियम २०१३ मधील कलम ५१,५२/२/अ यानुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस मुस्तफा कुरेशी यांना बजावली आहे. सात दिवसांत या नोटिसीचा लेखी जबाब सादर करण्याचे आदेशित केले असून या जमिनीची खरेदी-विक्री
थांबविण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.