योजनेचे पाणी वापरले वाळू धुण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:33 AM2019-04-23T00:33:49+5:302019-04-23T00:34:15+5:30
तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
आष्टी : तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळजन्य स्थितीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना पिण्याच्या पाण्याची नासाडी करण्याचा हा प्रकार प्रशासनाच्या दरबारात पोहोचला आहे.
टाकळी अमिया या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो मात्र याच टाकीच्या पाण्यातून गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाळू धुतल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. रविवारी सकाळी गावकरी पाण्याच्या टाकीजवळ गेल्यानंतर हा प्रकार पहायला मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात सरपंचाने वाळू धुतली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय टाकळी यांनी गावातील सर्व जनतेकडून पंधराशे रु पये नळपट्टी गोळा केली आहे तरी या नळपट्टीची लेखी पावती कोणालाही दिली गेलेली नाही आणि जनतेच्या पाण्याचा गैरवापर सरपंच व त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप ग्रामस्थ अशोक हनुमंत चौधरी यांनी केला आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी सचिन एकशिंगे, सखाराम ससाणे, राजेंद्र ससाणे , अशोक एकशिंगे, किरण चौधरी, काकासाहेब भवर , आमोल शितोळे, दादा पाटील चौधरी, उध्दव ससाणे, कचरु भुकन, महेश साबळे, अजहर पठाण, विकास कर्डीले, बंटी काकडे, रामदास काका चौधरी, मोहन भागडे, श्रीमंत चौधरी आदींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
ग्रामस्थांचे पाणी पळविले : कारवाई करा
व्हिडिओ क्लीपमध्ये पाण्याच्या टाकी परिसरात पाणी दिसत आहे हे मान्य आहे, मात्र हे पाणी पाईपलाईन फुटल्यामुळे साचले असल्याचे टाकळीचे सरपंच सावता ससाणे यांनी सांगितले.अवैध वाळू उपसा करायचा आणि गावक-यांच्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करायचा प्रकार हा अनेक दिवसांपासून सुरु असून याबाबत सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या गावचे रहिवासी अण्णासाहेब चौधरी यांनी केली आहे.