चोहाेबाजूने पाण्याचा वेढा, घरात रिकामा घडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:18+5:302021-09-14T04:39:18+5:30
शिरूर कासार : पाऊस असो, नसो शहराचे पाण्याचे शुक्लकाष्ठ संपता संपत नसून नागरिकांवर मात्र पाणी विकत घेण्याची ...
शिरूर कासार : पाऊस असो, नसो शहराचे पाण्याचे शुक्लकाष्ठ संपता संपत नसून नागरिकांवर मात्र पाणी विकत घेण्याची वेळ येते. सध्या शहराच्या चोहोबाजूने पाण्याचा वेढा असला तरी घरातला पाण्याचा घडा मात्र रिकामाच, अशी अवस्था झाली असून पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
सिध्देश्वर बंधारा, सिंदफणा व उथळा मध्यम प्रकल्पावरून शहराच्या पाण्याची सोय आहे. मात्र सध्या जुना जलकुंभ पाडला असल्याने सिद्धेश्वर व सिंदफना प्रकल्पात पाणी असले तरी त्याचा उपभोग घेता येईना. तर कधी लाईट तर कधी मोटार नादुरुस्त अशा कारणांमुळे उथळा प्रकल्पातील योजनेच्या पाणी पुरवठ्यात सतत अडथळा येत आहे. कित्त्येक वेळा पाईप फुटतुटीचे व जोडाजोडीचे प्रयत्न होतात. यात दोन ते तीन दिवस जातात. अशातच पुन्हा विजेचा व्यत्यय आला की पाण्याची साखळी तुटते. आधीच आठ-दहा दिवसांनी एका गल्लीचा नंबर लागतो. त्यात असा अडथळा आला की पाणी पाळी पुन्हा लांबते. अशा वेळी पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. आता उथळा प्रकल्प भरून वाहत आहे तर सिंदफणा कापरी नदी खळखळून वाहत असली तरी शहराला मात्र ऐन सणासुदीच्या काळात पाण्याची टंचाई भेडसावत आहे.
पंप बिघडला
उथळा प्रकल्पावर असलेले विद्युत पंप दोन दिवसांपासून बिघडल्याचे सांगितले जाते. हा पंप जळाला असल्यास त्याला पुण्याहून भरून आणावे लागत. त्याला किमान तीन-चार दिवस जातात. अशा परिस्थितीत मात्र शिरूर शहराला पाणी असूनही टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
योजनेतील अनेक चुकांमुळे वारंवार पाईप लिकेज, त्याची फुटतूट तसेच वीज पुरवठ्यात अडथळा, पंपाची नादुस्ती, पंप जळणे या गोष्टींमुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्रास होत आहे. आता जळालेली मोटार तत्काळ दुरुस्त करून पुरवठा सुरू होईल, असे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.
130921\img20210913105750.jpg
शिरूर शहराला पाणी विकत घेतल्याची आता जवळपास सवयच झाली असुन असे विकत घ्यावे लागते पाणी