बीड जिल्ह्यात पाणी चालले खोलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:17 AM2018-12-01T00:17:03+5:302018-12-01T00:17:39+5:30
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट होत आहे.
अनिल भंडारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ४ मीटरपर्यंत घटली आहे. धरण व गोदाकाठचा पट्टा असूनही माजलगाव तालुक्यात पाणी पातळी तब्बल साडेसहा मीटरने घसरली आहे. परिस्थिती पाहता जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील सर्वजनिक जलस्त्रोतांची पाणी पातळी दर तीन महिन्याला मोजली जाते. बीड जिल्ह्यात पाणी पातळी मोजण्यासाठी १२६ जलस्त्रोत निश्चित करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला सार्वजनिक स्त्रोतांची पाणी पातळी मोजण्यात येत होती. नंतर मात्र विविध कारणांमुळे जेथे सार्वजनिक स्त्रोत तपासणी शक्य नाही तेथे त्या परिसरातील खाजगी जलस्त्रोतांची पाणी पातळी मोजली जाते.
जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ६६६.६६ मिमी. इतकी आहे. यावर्षी पावसाळी हंगामात ३३४.३६ केवळ ५० टक्के इतका पाऊस झाला आहे. झालेला पाऊस सर्वत्र सारखा नसल्याने खरीप व रबी दोन्ही हंगाम धोक्यात आले आहेत. यावर्षी आॅक्टोबरच्या मध्यापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील एकूण १४४ प्रकल्पांपैकी दोन मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे. केवळ सहा प्रकल्पांमध्ये ५५ ते ६५ टक्के पाणीसाठा आहे. ६८ प्रकल्पाती पाणी पातळी जोत्याखाली असून ५५ प्रकल्प कोरडेठाक आहे. उर्वरित १६ प्रकल्पांमध्येही पाणीसाठा समाधानकारक नसल्याची स्थिती आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने तांत्रिक कामे करणाऱ्या कर्मचाºयांकरवी जलस्त्रोतांची मोजली जाते. आॅक्टोबरअखेर पावसाळा संपल्यानंतर जलस्त्रोत असलेल्या १२६ विहिरींची पाणीपातळी मोजणी करण्यात आली. पाणी पातळी मोजण्यासाठी निश्चित केलेले काही जलस्त्रोत जुने व पडझड झालेले आहेत. त्यामुळे शेजारच्या विहिरीतील पाणीपातळी मोजण्यात आली. मोजलेली पातळी कमालीची खोलवर जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात जवळपास साडेसहा मीटरने पाणीपातळी घसरली असून पाण्यासाठी समृद्ध असणाºया या तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे.
१२६ विहिरी : दर तीन महिन्याला मोजमाप
बीड तालुक्यात १७, अंबाजोगाईत १२, आष्टीत २३, धारुर ३, गेवराई १७, केज ३, माजलगाव १६, परळी १०, पाटोदा ९, शिरुर १०, वडवणी तालुक्यातील ६ अशा १२६ विहिरींची पाणी पातळी दर तीन महिन्याला मोजली जाते.
बीड तालुक्यात १ मीटर, अंबाजोगाईत २.७५ मीटर, आष्टीत १. २५ मीटर, धारुर ४ मीटर, गेवराई ४.७५ मीटर, केज अडीच मीटर, माजलगाव ६.४६ मीटर, परळी १ मीटर, पाटोदा २.२१, शिरुर ३.८९, वडवणी तालुक्यात १.३९ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबरमधील उन्हाची तीव्रता पाहता पाणी पातळीत आरखी घट होत आहेत.