बिंदुसरेला पाणी वाढले, कर्पराला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:38 PM2019-11-03T23:38:39+5:302019-11-03T23:39:10+5:30
सलग दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तर आहेच, त्याचबरोबर अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरु आहे. रविवारी शहरातून जाणाºया बिंदुसरा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
बीड : सलग दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तर आहेच, त्याचबरोबर अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरु आहे. रविवारी शहरातून जाणा-या बिंदुसरा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे शहराच्या अंकुशनगर भागातील कर्परा नदीलाही पाणी वाढल्याने उद्भवलेल्या पूर सदृष्य स्थितीमुळे या परिसराचा संपर्क तुटला होता. दरम्यान शनिवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रविवारी धारुर शहराला पुन्हा पावसाने झोडपले.
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारपासून पंचनामे करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी अडथळे आले. बीड शहराला पाणीपुरवठा होणारे बिंदुसरा धरण ओसंडून वाहत आहे. शनिवार आणि रविवारी पाली धरण परिसरातील गावांमध्ये झालेल्या पावसामुळे बीड शहरातून जाणाºया बिंदुसरा नदीच्या पात्रात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पाणी वाढले. नदीलगतच्या पात्रातच रविवारचा बाजार भरला होता. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेकांनी धास्ती घेतली होती. बाभळीची झाडे व झुडुपांमुळे अरुंद पात्रातून वाहणाºया पाण्याची पातळी पुलापासून पाच फूट कमी होती.
दरम्यान नगर परिषदेच्या यंत्रणेकडून ध्वनीक्षेपकाद्वारे सावधगिरीचा इशारा देण्यात येत होता, तर पोलीसही वाहतूक सुरळीत करत होते. नदीला वाढलेले पाणी पाहण्यासाठी मुलांसह मोठ्यांनी गर्दी केली होती. पुलावर विक्रीसाठी बसलेल्या आणि बाजारातील विके्रत्यांनीही दुकाने आवरली.
कर्पराला दिवसातून दोन वेळा पाणी वाढते
शहरातील अंकुशनगर भागातील कर्परा नदीलाही सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास पाणी वाढले. कपिलमुनी नगर व इतर भागाचा संपर्क तुटला होता. कर्परा नदीला सध्या दररोज दोन वेळा पाणी वाढून पूरसदृष्य स्थिती निर्माण होते. येथील पूल काही वर्षांपासून नादुरुस्त आहे.
मध्यभागी खड्डा पडल्यामुळे आणि कठडे वाहून गेल्यामुळे उरलेल्या अरुंद रस्त्यातून वाट काढत नागरिकांना जीव धोक्यात घालून जावे लागते. कर्परा नदीचा पूल व रस्ता पाण्याखाली जाण्याची यंदाच्या पावसाळ्यातील दहावी वेळ असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
बिंदुसरेकाठच्या नागरिकांनी सतर्करहावे
बिंदुसरा नदी दुधडी भरु न वाहत आहे. तसेच पुन्हा पाऊस होण्याची शक्यता असून बिंदूसरा नदीपात्राच्या जवळ असलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे. प्रशासनालाही या बाबत खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून शहरी व ग्रामीण भागातील बिंदूसरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
प्रशासनाने उपाय करावेत
पाऊसकाळ असल्याने बिंदुसरा धरण, नदी तसेच कपिलधार परिसरात जलसौंदर्य पाहण्यासाठी काही लोक धाडस करतात. मागील घटना लक्षात घेऊन प्रशासनाने उपाय करण्याची गरज आहे.