शिवारफेरी काढून आंबेवडगावात विहिरींची पाणीपातळी मोजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:09+5:302021-01-03T04:34:09+5:30
तालुक्यातील आंबेवडगाव येथे पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित समृद्ध ग्राम स्पर्धेमधील जलमित्रांनी शनिवारी शिवारफेरी केली. गावातील दहा विहिरींची पाणीपातळी ...
तालुक्यातील आंबेवडगाव येथे पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित समृद्ध ग्राम स्पर्धेमधील जलमित्रांनी शनिवारी शिवारफेरी केली. गावातील दहा विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली. दुष्काळी कामे, कंपार्टमेंट बंधारे, सीसीटीची कामे उन्हाळ्यामध्ये करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लोकसहभागातून ही कामे झाल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक नितीन पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलमित्र सचिन भोजने, विठ्ठल वाघमोडे, अर्जुन माने, सिद्राम थोरात, उनकेश्वर नायकोडे यांनी पाणीपातळीचे मोजमाप करून शिवार फेरी पूर्ण केली. समृद्ध ग्राम योजनेच्या कामात गावातील लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
अशी केली विहिरीतील पाणी पातळीची मोजणी
२४ तासांपूर्वी पाणी उपसा झालेल्या विहिरी, १२ तासांपूर्वी पाणी उपसा झालेल्या विहिरी, तसेच पाणी उपसा न झालेल्या विहिरी, तलाव नाल्याजवळ नसणाऱ्या विहिरी, अशा दहा विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली. यावरून गावातील विहिरींची पाणी पातळी किती आहे, याचे मोजमाप घेण्यात आले. यानंतर परत उन्हाळ्यामध्ये विहिरींची पाणीपातळी मोजण्यात येणार आहे. हिवाळ्यातील स्थिती आणि उन्हाळ्यात पडणारा फरक यातील तफावत किती आहे, हे ग्रामस्थांना समजणार आहे.