आडसच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:14+5:302021-07-17T04:26:14+5:30

दीपक नाईकवाडे केज : तालुक्यातील आडस येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या इमारतीला संततधार पडणाऱ्या पावसात छताला गळती लागून इमारतीत ...

Water only in the veterinary hospital of Adas | आडसच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पाणीच पाणी

आडसच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पाणीच पाणी

Next

दीपक नाईकवाडे

केज : तालुक्यातील आडस येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या इमारतीला संततधार पडणाऱ्या पावसात छताला गळती लागून इमारतीत सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेर थांबूनच शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून पशुधनावर उपचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इमारतीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात सतत चर्चेत असणारे व तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या आडस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात केज, धारूर व अंबेजोगाई तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार करण्याची जबाबदारी आहे. अशा या दवाखान्याची इमारत अखेरची घटका मोजत आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण इमारतीला गळती लागून सर्वत्र पाणी साठून कागदपत्रे भिजल्याने त्यांचा लगदा झाला आहे. ही इमारत कुठल्याही क्षणी कोसळेल, याचा भरवसा नसल्याने, कर्मचारी इमारतीबाहेर थांबून जनावरांवर उपचार करत आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष लक्ष देऊन इमारतीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांतून केली जात आहे.

रिक्त जागा त्यात इमारतीची दुरवस्था

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या ठिकाणी जनावरांवर उपचार करण्यासाठी नियुक्त पशुधन विकास अधिकारी डॉ.दत्तात्रय मसने यांच्याकडे केज येथील अतिरिक्त पदभार, पशुधन पर्यवेक्षक श्रीमती सी.जे. तांदळे यांच्याकडे पंचायत समिती पशुविकास अधिकाऱ्याचा (विस्तार) अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे येथे दोन परिचर व एक ड्रेसर हेच पूर्णवेळ काम पाहतात. अगोदरच रिक्त पदे त्यात इमारतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास मोडकळीस आलेल्या इमारतीस धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार

सध्याची मोडकळीस आलेली इमारत ही साधारपणे ६० वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर, या इमारतीसमोरच दहा वर्षांपूर्वी तीन खोल्यांची इमारत बांधण्यात आली. मात्र, या इमारत बांधकामास जागा मालकाची पूर्व संमती घेतली नसल्याने, त्याने अतिक्रमण केले आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा सध्या येथील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पर्यायी जागा आवश्यक

मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीत काम करताना कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. यासाठी किमान ग्रामपंचायत कार्यालयाने पर्यायी जागेची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे.

-डॉ.एस.पी. थळकरी, प्रभारी पशुधन विकास अधिकारी, विस्तार, पंचायत समिती, केज.

Web Title: Water only in the veterinary hospital of Adas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.