केजच्या शिक्षक कॉलनीत पाणीटंचाई; रहिवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:40 AM2018-06-02T00:40:01+5:302018-06-02T00:40:01+5:30
केज : शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या शिक्षक कॉलनीसह परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आटल्याने नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी करूनही नळयोजना करण्यात आली नसल्याने शिक्षक कॉलनीसह परिसर आजही तहानलेलाच आहे.
लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने विस्तारित शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास नगरपंचायत कमी पडत आहे. शिक्षक कॉलनीसह परिसरात हजारो नागरिकांनी गेल्या २५ वर्षापासून कॉलनीत पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना चालू करावी, या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने केली; मात्र, कोणत्याही प्रकारची योजना आजतागायत राबविण्यात आली नसल्याने परिसरातील रहिवाशांनी पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून न राहता घरोघरी बोअरवेल घेत पाण्याचा प्रश्न तात्पुरता सोडवला. मात्र, कडक उन्हामुळे दोन महिन्यांपूर्वी बोअरवेलचे पाणी आटले.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत नगर पंचायतीने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. शिक्षक कॉलनीलगतच शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित असताना नागरिकांना मात्र टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र केज शहरात दिसते. या बाबतीत अधिक माहितीसाठी केज नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. शिक्षक कॉलनीसह परिसरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यापूर्वी आटल्यानंतर नगरपंचायतकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र, नगरपंचायतने पाण्याची पर्यायी व्यवस्था केली नसल्याने नागरिकांना तीन हजार लिटरचे पाण्याचे टँकर नऊशे रुपयांस घ्यावे लागत असल्याचेही दत्ता धस म्हणाले.
पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष - दत्ता धस
शिक्षक कॉलनी व परिसरातील नागरिकांनी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, अद्यापही या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना राबविले आलेली नसल्याने पाण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल घेतले. मात्र ते उन्हाळ्यात आटत असल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे अशी माहिती या भागातील रहिवासी दत्ता धस यांनी दिली.