बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:11 AM2019-07-09T00:11:23+5:302019-07-09T00:12:01+5:30
पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. सद्यस्थितीत शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून दिवभरात ५० ते ६० खेपा केल्या जात आहेत. हद्दवाढ भागात मात्र, आजही पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे सांगण्यात आले.
जून संपून जुलैचा पहिला आठवडाही पूर्ण झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात कोठेच वरूणराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे जलसाठे कोरडेठाक आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाली येथील बिंदुसरा आणि माजलगाव धरणही कोरडे पडले आहे. सध्या माजलगाव धरणात चर खोदून बीड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र, मागणीपेक्षा कमी पाणी येत असल्याने शहरात १० ते १५ दिवसानंतर नळाला पाणी येते. त्यामुळे बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
दरम्यान, शहरात तरी १५ दिवसाला पाणी येते. मात्र, हद्दवाढ भागात तर पाणीच येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हाच धागा पकडून पालिकेने शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला आहे. हे टँकर खासकरून स्वराज्य नगर, सोमेश्वर मंदिर परिसर, संत नामदेव नगर, अंकुश नगर, बार्शी रोड, पिंपरगव्हान रोड आदी भागात आहेत. तसेच जिल्हा रूग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह, वसतीगृह, शाळा आदी ठिकाणीही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सुपरवायझर पी.आर.दुधाळ यांनी सांगितले.