बीड जिल्ह्यात २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:53 AM2019-01-08T00:53:24+5:302019-01-08T00:53:57+5:30

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

Water supply through 230 tankers is started in Beed district | बीड जिल्ह्यात २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु

बीड जिल्ह्यात २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या २३० टँकरच्या माध्यमातून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अजूनही अनेक गावात मागणी असून देखील टँकर सुरु करण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या वतीने पुन्हा पाहणी करुन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे प्रशासनाला किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे तीव्र पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. गावात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने प्रस्ताव मागवून जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यानंतर अनेक वेळा मागणी करुन देखील टँकर सुरु करण्यात आले नव्हते. नागरिकांनी टँकरसाठी आंदोलन व मागणीचा रेटा लाऊन धरल्यामुळे १४ शासकीय, तर २१६ खाजगी टँकरच्या माध्यमतून १९६ गावे व ७० वाड्यांना पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील अनेक गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, ग्रामपंचायतच्या वतीने तेथील प्रस्ताव मागवण्यात आले होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून टँकर सुरु करण्याचे अधिकार शासनाने दिले आहेत. मात्र, या सर्व प्रशासकीय कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे टँकर सुरु होऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ टँकर सुरु करावेत अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी भरलेल्या निविदांची सोडत प्रक्रिया १६ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

Web Title: Water supply through 230 tankers is started in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.