पोहताना विहिरीतील पाण्याचा अंदाज आला नाही; दोन मुलांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:13 PM2020-08-26T17:13:26+5:302020-08-26T17:17:58+5:30
बाहेगव्हाण येथील बंधाऱ्यावर रोहन व लखनसह १० ते १५ मुले पोहण्यासाठी गेले होते.
वडवणी (जि. बीड) : तालुक्यातील बाहेगव्हाण येथील १० वर्षीय रोहन रामेश्वर मस्के व लखन महादेव पोटभरे या दोन मुलांचा गावातील नदीकाठच्या विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना २५ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेल्यानंतर घडली.
बाहेगव्हाण येथील बंधाऱ्यावर रोहन व लखनसह १० ते १५ मुले पोहण्यासाठी गेले होते. बंधारा खोल नसल्याने व त्याठिकाणी पाय टेकत असल्यामुळे अनेकजण पोहायला शिकत होते. याच बंधाऱ्याजवळ एक विहीर आहे. पाणी जास्त असल्यामुळे विहिरीच्या खोलीचा अंदाज येत नाही. याच विहिरीकडे रोहन व लखन हे पोहण्यासाठी गेले होते. बराच वेळ ते दोघे न दिसल्यामुळे बंधाऱ्यावर पोहणाऱ्या इतर मुलांनी आरडाओरड करत गावाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर ही माहिती गावकऱ्यांना व मृतांच्या घरच्यांना समजताच त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी गावातील तरुणांनी विहिरीत उडी मारून तळाशी असलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ उपाचारासाठी वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब तांदळे, डॉ अरूण मोराळे यांनी तपासून त्या दोघांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सुटी संपल्याने पुन्हा देशसेवेसाठी परतत असताना अपघात #CRPFJawan#Deathhttps://t.co/m46QCPtgfn
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 26, 2020
पोटभरे कुटुंबावर शोककळा
लखन पोटभरे याचे वडील दोन वर्षांपूर्वी मयत झाले होते. लखन हा चुलता रवी पोटभरे यांच्याकडे राहत होता. रवी पोटभरे हे मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करीत होते. वडिलांचे छत्र हरवलेले असताना मुलगाही मयत झाल्याने पोटभरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. लखनला पोहता येत होते तर, रोहन हा शिकत होता. विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने रोहन हा विहिरीच्या पाण्यात बुडाला. त्यानंतर लखनदेखील बुडाला, यात त्यांचा मृत्यू झाला.