चार एकरांत टरबूज, खरबुजातून सात लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:11+5:302021-05-14T04:33:11+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील खरात आडगाव येथील शेतकऱ्याने केवळ तीन महिन्यांत चार एकर टरबूज व खरबूज लागवडीतून सात ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील खरात आडगाव येथील शेतकऱ्याने केवळ तीन महिन्यांत चार एकर टरबूज व खरबूज लागवडीतून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. या शेतकऱ्याने पंधरा-पंधरा दिवसांच्या अंतराने हे पीक घेतल्याने याचा फायदा या शेतकऱ्याला झाला.
खरात आडगाव येथील शेतकरी बाळासाहेब श्यामराव आढाव यांना तीन भावांमध्ये मिळून सहा एकर शेती आहे. यापैकी दोन एकर शेतात खरबूज, तर दोन एकर शेतात टरबुजाची बाग केली. ही फळबाग करताना या शेतकऱ्याने १५-१५ दिवसांच्या फरकाने अर्धा-अर्धा एकरमध्ये लागवड केली. यामुळे या शेतकऱ्यास फळ विक्री करताना धावपळ करण्याची वेळ आली नाही. ही फळबाग या शेतकऱ्याने भोयाला न देता स्वतः घरीच केली. तीन महिन्यांच्या काळात टरबुजाचे एक एक फळ ७ ते ८ किलो भरत असल्याने व त्याचा दर्जा एकदम चांगला असल्याने बाजारपेठेतून मागणी येऊ लागली. त्यामुळे या फळाला नऊ रुपये भाव मिळाला. यामुळे दोन एकरातील टरबूज पिकातून शेतकऱ्यास जवळपास चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी शेतकऱ्यास ९० हजार रुपये खर्च आला होता, तर निव्वळ नफा ३ लाख दहा हजार रुपये मिळाला.
टरबुजाबरोबरच शेतकऱ्याने २ एकर खरबुजाचीदेखील लागवड केली होती. खरबुजाची लागवड ही आठ दिवसांच्या फरकाने केल्याने हे फळ विक्री करण्यास शेतकरी कोणाच्या पाठीमागे न लागता स्वतःच एक गाडी माजलगाव शहरात, तर दुसरी गाडी ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जात असत. यामुळे या फळाला त्यांना २०-२२ रुपयांचा भाव मिळू शकला. खरबुजाचे फळ हे दोन किलोपेक्षा जास्त भरत असल्याने या शेतकऱ्यास यातून ३ लाख ३० हजारांचे उत्पन्न मिळाले, तर या खरबूज लागवडीसाठी ६० हजार रुपये खर्च या शेतकऱ्याने केला. त्यामुळे या शेतकऱ्यास निव्वळ २ लाख ७० हजार रुपये नफा मिळाला.
------
आम्ही खरबूज व टरबुजाची लागवड करताना अर्धा-पाऊण एकरमध्ये आठ दहा दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे अंतर ठेवल्याने आम्हाला कोणाच्या मागे न लागता थोडी थोडीफळे विकता आली. यामुळे आम्हाला अपेक्षेपेक्षा दुप्पट पैसे याद्वारे मिळू शकले.
- बाळासाहेब आढाव ,शेतकरी, खरात आडगाव
===Photopath===
130521\purusttam karva_img-20210501-wa0020_14.jpg~130521\purusttam karva_img-20210501-wa0016_14.jpg