चिंचाळ्याचा खटकळी तलाव फुटण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:51+5:302021-09-10T04:40:51+5:30
आष्टी : तालुक्यात काही महसूल मंडळात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. बहुतांशी प्रकल्प हे १०० ...
आष्टी : तालुक्यात काही महसूल मंडळात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. बहुतांशी प्रकल्प हे १०० टक्के भरले आहेत. चिंचाळा येथील खटकळी बाबा देवस्थान जवळील खटकळी मध्यम साठवण तलाव १०० टक्के भरला असून त्यांची संरक्षण भराव भिंत फुटण्याच्या मार्गावर असून भिंतीला मोठे भगदाड पडले आहेत. याबाबत चिंचाळा ग्रामस्थांनी वारंवार तक्रार देऊनही लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार गावकरी करत आहेत.
३० वर्षांपूर्वी झालेला खटकळी मध्यम साठवण तलाव सध्या १०० टक्के भरला आहे. सांडव्यामधून पाणी पडले आहे. मात्र,तलावाच्या मुख्य संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. पावसाळ्याचे उर्वरित दिवस लक्षात घेता व पुढील दिवसात जोराचा पाऊस होऊन डोंगरातून पाण्याचा मोठा लोंढा आला तर दगडी भरावाला भगदाड पडल्याने माती खचून तलाव फुटण्याची शक्यता आहे ? यामुळे चिंचाळा,शिदेवाडी,कासारी या गावांना धोका होऊ शकतो. चिंचाळा ग्रामस्थांनी याबाबत लघु पाटबंधारे विभागाला कळवले आहे. मात्र आजपर्यंत एकही अधिकारी व कर्मचारी फिरकला नसल्याचे ग्रामस्थांनी लोकमतला सांगितले.
चौकट
दरवर्षी निधी येणारा जातो कुठे ?
तलावाच्या डागडुगीसाठी दरवर्षी शासन निधी देते. मात्र तो निधी जातो कुठे ? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. अधिकारी व ठेकेदार त्याचे काय करतात? असाही प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत लघु पाटबंधारे कार्यालयाला विचारणा केली असता हा तलाव कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे हे समजले नाही. याच विभागातील अधिकारी म्हणाले, हे काम आमच्याकडे नाही. काम जुने असून यातील काही अधिकारी देवाघरी गेलेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. नेमका प्रश्न विचारायचा तरी कोणाला? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
090921\img-20210909-wa0446_14.jpg~090921\img-20210909-wa0444_14.jpg