हम भी कम नही ! ... पालिकेनंतर पोलिसांनीही लावले अनधिकृत बॅनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:24 AM2020-01-22T11:24:04+5:302020-01-22T11:27:34+5:30
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आता सामान्यांमधून पुढे येत आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : बीड शहरात सध्या अनधिकृत बॅनरबाजीचे चांगलीच चढाओढ लागली आहे. आगोदर पालिकेने आणि आता ‘हम भी कम नही’ असे म्हणत बीड पोलिसांनी देखील अनाधिकृत बॅनर लावून नियमांचे उल्लंघन केले आहे. कारवाई करणारेच नियम पायदळी तुडवित असल्याने कारवाईची अपेक्षा करायची कोणाकडे? असा सवाल उपस्थित होत आहे. जनजागृतीच्या नावाखाली सध्या प्रशासनच शहराचा चेहरा विद्रूप करताना दिसत आहे.
बीड शहर सध्या बॅनर, होर्डिंग्जमुळे विद्रुप झाल्याचे दिसत आहे. पालिकेच्या नियमात केवळ २४ ठिकाणीच बॅनर लावण्याची अधिकृत परवानगी आहे. मात्र, शहरात गल्ली बोळात आणि चौकाचौकात मोठे मोठे बॅनर अनधिकृतपणे लावल्याचे दिसतात. याचा त्रास सामान्य नागरिकांसह वाहनधारकांना तर होतच आहे, शिवाय शहराचे विद्रुपीकरणही होत आहे. असे असतानाही याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, ज्या पालिकेने अनाधिकृत बॅनरवर कारवाई करायला पाहिजे, तीच पालिका नियम पायदळी तुडवित आहे. आता पोलिसांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शहरात रस्ता सुरक्षा अभियानचे अनाधिकृत बॅनर लावले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनजागृती जरी असली तरी शासनाने ते बॅनर अनधिकृतपणे लावावे, अशी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आता सामान्यांमधून पुढे येत आहे.
म्हणून मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रिया टाळली
या अनधिकृत बॅनरबद्दल पालिकेची प्रतिक्रिया घेणे आवश्यक होते. मात्र, खुद्द पालिकेनेचे अनधिकृत बॅनर लावून नियम पायदळी तुडविल्याने पालिका प्रमुख मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची प्रतिक्रिया घेणे टाळले. पालिकेने लावलेल्या अनाधिकृत बॅनरबद्दल दोरकुळकर यांच्याशी वारंवार संवाद केला, मात्र, त्यांना उत्तर देता आलेले नाही. तर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना विचारले असता, त्यांनी याबाबत विचारण केली जाईल असे सांगितले. अधिक माहिती अपर पोलीस अधीक्षकांकडे घेण्यास सांगितले. अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्याशी संपर्क केला, मात्र, त्यांचा भ्रमणध्वणी नेटवर्क मध्ये नसल्याचे सांगण्यात आले.