वजन काटे सदोष, ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:59+5:302021-03-01T04:38:59+5:30
अंबाजोगाई : चिल्लर व ठोक विक्रीच्या व्यवसायांमध्ये वापरण्यात येत असलेले बरेचसे वजनकाटे सदोष आहेत. विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली ...
अंबाजोगाई : चिल्लर व ठोक विक्रीच्या व्यवसायांमध्ये वापरण्यात येत असलेले बरेचसे वजनकाटे सदोष आहेत. विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी व ती यंत्रणा वर्षानुवर्षे इकडे फिरकत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन व्यापारी लूट करीत आहेत.
गुटखा विक्री सुरूच
चौसाळा : राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरी शहरी भागात अगदी सहजरित्या गुटखा उपलब्ध होतो. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाया करण्याची मागणी होत आहे.
निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. या रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नसल्याने सहा महिन्यांतच या नवीन रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. नवीन झालेल्या या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, तर अनेक ठिकाणचे रस्ते खचून गेले आहेत. यामुळे चालकांना वाहने चालविताना त्रास सहन करावा लागत आहे.
किडीमुळे कापूस उत्पादन घटणार
अंबाजोगाई : तालुक्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले. आता कापूस बहरात आला होता, तर कापसावर बऱ्याच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसावर हे नवीनच संकट आल्याने कापसाच्या उत्पादनात घट होऊ शकते.
डासांची उत्पत्ती वाढली
वडवणी : शहरातील गटारींची स्वच्छता मागील काही महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. उघड्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून, डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वडवणीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता करण्याची मागणी आहे.
वृक्षतोड थांबवा
पाटोदा : तालुक्यातील अनेक भागामधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून, सॉ-मिल चालक मात्र मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. मात्र, परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. यावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.
कार्यालयांना गाजर गवताचा वेढा
पाटोदा : शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. परंतु अद्यापही अनेक कार्यालयातील वाढलेल्या झाडीझुडपाकडे कोणाचेही लक्ष गेलेले नसून, स्वच्छतेची मागणी केली जात आहे.