सुशिक्षित पुन्हा बेरोजगार : कंत्राटी कोरोनायोद्धांच्या नोकरीवर ३१ ऑगस्टला कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:30+5:302021-08-25T04:38:30+5:30
सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात भरती केलेल्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली ...
सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात भरती केलेल्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अतिरिक्त संचालकांनी निधीची कमतरतेचे कारण देत सर्वच कंत्राटी कर्मचारी ३१ ऑगस्टला कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हजारो सुशिक्षित पुन्हा बेरोजगार हाेणार आहेत.
मागील दीड वर्षांपासून कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. पहिल्यापेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. लाखो लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. कोरोनाची महामारी पाहता आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी २० जुलै २०२० रोजी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये तीन महिन्याचे कंत्राट देऊन शिपाई ते डॉक्टर अशी हजारो पदे भरण्यात आली. परंतु आता अपवादात्मक जिल्हेवगळता इतरत्र रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा करत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत हे सर्व कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याच्या सूचना अतिरिक्त संचालकांनी १७ ऑगस्ट रोजी सर्वच जिल्ह्यांना व्हिसीद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो सुशिक्षितांना पुन्हा बेरोजगार व्हावे लागणार आहे.
..
नियमित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सेवेची जबाबदारी
कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त केल्यानंतर रुग्णसेवेची जबाबदारी ही नियमित व एनएचएमअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. शिपाई ते डॉक्टर या सर्वांना कोरोना महामारीत सेवा द्यावी लागणार आहे. या सेवेबरोबरच नियमित सेवेकडेही दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता कामाचा आणि सेवेचा ताण आणखीनच वाढणार आहे.
....
बीडमध्ये सीईओंनी काढले पत्र
संचालकांच्या सूचनेप्रमाणे मनुष्यबळ कमी करण्यासंदर्भात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना पत्र काढले आहे. दक्षता घेऊन नियोजन करावे, अशा सूचनाही कुंभार यांनी सर्वांनाच दिल्या आहेत.
...
...तर यंत्रणा कोलमडेल
राज्यात जवळपास सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच हे कंत्राटी मनुष्यबळावरच सुरू आहे. त्यांना कमी केल्यावर रुग्णसेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. एनएचएमने निधी देण्यास नकार दिला असला तरी जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन अथवा इतर योजनांमधून निधी जमा करत कंत्राटी लोकांचा पगार देता येऊ शकतो. हे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. असे झाल्यास ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे, तेथे मनुष्यबळ कायम राहू शकते.
---
निधीची कमतरता आणि काढलेले पत्र बरोबर आहे. ज्या ठिकाणी कोविड आहे, ज्याठिकाणी खरोखरच गरज आहे, त्याच ठिकाणी कंत्राटी मनुष्यबळ ठेवणार. इतरांना काढणार.
-एन. रामास्वामी, आयुक्त, आरोग्यसेवा महाराष्ट्र