अंबाजोगाई, किनवट जिल्हा निर्मितीचे काय ? सहा मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 02:28 PM2020-01-29T14:28:00+5:302020-01-29T14:35:18+5:30

बीड आणि नांदेड जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव प्रलंबित

what about the creation of Ambajogai and Kinawat district? | अंबाजोगाई, किनवट जिल्हा निर्मितीचे काय ? सहा मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेत

अंबाजोगाई, किनवट जिल्हा निर्मितीचे काय ? सहा मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेत

googlenewsNext
ठळक मुद्देमागील ३५ वर्षांपासून अंबाजोगाईकरांची मागणी१९९५ पासून किनवटवासीयांची मागणी

बीड / नांदेड : उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचालींनी वेग घेतला असतानाच नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील ३५ वर्षांपासून अंबाजोगाईकर आणि १९९५ पासून किनवटवासीयांनी शासकीय स्तरावर ही मागणी लावून धरली आहे. किनवट जिल्हा करून मांडवी व इस्लापूर हे दोन नवीन तालुके करण्याबाबत अनेक वेळा आंदोलने झाली आहेत़

लढा एका जिल्ह्यासाठी

लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाने मागविल्यानंतर शासन स्तरावर उचित निर्णय होण्याची विनंती करणारे पत्र महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आले आहे. सदरील प्रस्तावाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दुजोरा दिला. मात्र, जिल्ह्याची निर्मिती कधी होणार, याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. 

दरम्यान, बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी गेल्या ३५ वर्षांत हिंसक आंदोलनांसह शांततामय तथा लोकशाही मार्गाने आंदोलने सुरूच आहेत. आजतागायत सहा मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. तसेच १९९५ पासून किनवटवासीयांनी शासकीय स्तरावर ही मागणी लावून धरली आहे़ किनवट जिल्हा करून मांडवी व इस्लापूर हे दोन नवीन तालुके करण्याबाबत अनेक वेळा आंदोलने झाली आहेत़ मात्र, किनवट आणि अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. 

आयुक्तालय विभाजनाचा अहवाल पडून 
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांसाठी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तालय आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी औरंगाबाद लांब पडत असल्यामुळे आयुक्तालय विभाजनाचा प्रस्ताव मध्यंतरी पुढे आला होता. या विभाजनाचा अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीने विभागीय आयुक्तालय कुठे करावे, यासाठी गोपनीय अहवाल देऊन साडेचार वर्षे झाले आहेत; परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अहवालात लोकसंख्या आणि भौगोलिक निकषांचा विचार करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तालय करायचे की त्रिभाजन करायचे, याबाबत दिलेला तो अहवाल शासन पातळीवर तसाच पडून आहे. 

असा असेल नवीन उदगीर जिल्हा
लातूर जिल्ह्याचे विभाजन करून व मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सर्कल उदगीरला जोडून उदगीर नवीन जिल्हा निर्माण करण्याची २५ वर्षांपासूनची मागणी आहे़विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उदगीर जिल्हा निर्मिती व प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव तात्काळ पाठविण्यासंदर्भात प्रधान सचिवांना एका पत्रानुसार कळविले आहे. 

Web Title: what about the creation of Ambajogai and Kinawat district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.