आमदार प्रकाश सोळंकेंच्या सूतगिरणीच्या जागेचे गौडबंगाल आहे तरी काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:13 PM2020-11-06T17:13:59+5:302020-11-06T17:17:39+5:30

 सदरील जमीन हस्तांतरण प्रक्रियेच्या मूळ संचिकेची मागणी माहिती अधिकारात करण्यात आली असता सदर संचिकाच तहसील कार्यालयाच्या अभिलेखात नसल्याचे तहसीलदारांनी अर्जदारास लेखी दिले

What about the land of MLA Prakash Solanke's spinning mill? | आमदार प्रकाश सोळंकेंच्या सूतगिरणीच्या जागेचे गौडबंगाल आहे तरी काय ?

आमदार प्रकाश सोळंकेंच्या सूतगिरणीच्या जागेचे गौडबंगाल आहे तरी काय ?

Next
ठळक मुद्देजागा फेरफार संचिका गायब जागा दुसऱ्या उद्योगाला आंदण

-  पुरूषोत्तम करवा

माजलगाव :  शेतकऱ्यांच्या हिताचे गाजर पुढे करत आ. प्रकाश सोळंके यांनी २००६ मध्ये सूतगिरणीच्या नावावर शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या माध्यमातून निधी जमा करत शहराच्या बाजूलाच असलेल्या सर्व्हे नं. ३७७ मध्ये २ एकर जागा खरेदी केली होती. हीच जागा पुढे अवघ्या दोन वर्षांतच पत्नी चेअरमन असलेल्या एका सहकारी उद्योग संस्थेला आंदण देण्याचा प्रकार घडला आहे. कारण ही जागा हस्तांतरित करण्यासाठीची मूळ संचिकाच तहसील कार्यालयाच्या अभिलेखातून गायब झाली आहे. यामुळे आ. सोळंकेच्या सूतगिरणीचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजलगाव तालुक्याच्या राजकारणात पाय रोवण्यासाठी आ. प्रकाश सोळंके यांनी २५ वर्षांपूर्वी मतदारसंघात प्रवेश केला. त्यावेळी शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखविण्यासाठी तालुक्यात कापूस उत्पादकांचे हित पुढे करीत आ. सोळंकेंनी सूतगिरणी निर्माण करण्याचा बनाव केला. यासाठी त्यांनी शेअर्सच्या नावावर मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला. १९९६ साली माजलगाव शेतकरी सह. सूतगिरणी मर्या. या नावाने नोंदणी केली. शहरातील गजानन मंदिराजवळ कार्यालय थाटले अन् सूतगिरणीचा कागदोपत्री कारभार सुरू केला.

पूर्वी माजलगाव तालुक्यात असलेल्या चाटगाव येथे मोठ्या प्रमाणात सूतगिरणीच्या निर्मितीसाठी जागा खरेदी करण्यात आली. त्यानंतर सन २००६ साली शहराच्या बायपास लगत असलेल्या सर्व्हे नं. ३७७ गट नं. २३७ मध्ये याच सूतगिरणीच्या नावावर एका शासकीय नोंदणीकृत नसलेल्या गृहनिर्माण संस्थेकडून २ एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर दोन वर्षे ही जमीन सूतगिरणीच्या नावावर ठेवल्यानंतर सन २००८ मध्ये स्वतःची पत्नी मंगल प्रकाश सोळंके या चेअरमन असलेल्या माजलगाव सहकारी वस्त्रोद्योग औद्योगिक संस्थेच्या नावावर करण्यासाठी माजलगाव तहसील कार्यालय, माजलगाव यांचे पत्र क्रमांक २००८ आरओआर कावि दि. २० ऑक्टोबर २००८ च्या आदेशान्वये फेर घेण्यात आला. सदरील जमीन हस्तांतरण प्रक्रियेच्या मूळ संचिकेची मागणी माहिती अधिकारात करण्यात आली असता सदर संचिकाच तहसील कार्यालयाच्या अभिलेखात नसल्याचे तहसीलदारांनी अर्जदारास लेखी दिले. त्यामुळे याचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जागेला सोळंकेंचे नाव
वास्तविक पाहता सद्य:स्थितीत सातबारा उताऱ्यावर चेअरमन माजलगाव सह. उद्योग संस्था मर्या. माजलगाव चेअरमन मंगल प्रकाश सोळंके या नावाने ही जागा नोंद आहे. त्यामुळे सदर जागा खरेदीचा नेमका उद्देश काय होता, असाही सवाल उपस्थित होत आहे.

सदर प्रकरणात मला अद्याप काहीच माहिती नाही. तहसील कार्यालयातून संचिका गायब आहे किंवा नाही याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांला विचारून सांगावे लागेल. 
- वैशाली पाटील, तहसीलदार माजलगाव

सदर प्रकरणात काय अडचण आहे हे मला माहीत नसून याची संपूर्ण माहिती घेतो. परंतु संबंधित जागा ही कोणत्याही खासगी व्यक्तीच्या नावावर नसून ती संस्थेच्या नावावर आहे. 
-आ.प्रकाश सोळंके, चेअरमन सूतगिरणी

Web Title: What about the land of MLA Prakash Solanke's spinning mill?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.