'रेमडेसिविर'साठी काय पण; रात्रभर जागून पहाटे मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:34 AM2021-05-10T04:34:11+5:302021-05-10T04:34:11+5:30
बीड : लोक सध्या रेमडेसिविरसाठी काय पण करायला तयार आहेत. एका तरुणाने रेमडेसिविर चोरण्यासाठी शनिवारची पूर्ण रात्र जागून काढली. ...
बीड : लोक सध्या रेमडेसिविरसाठी काय पण करायला तयार आहेत. एका तरुणाने रेमडेसिविर चोरण्यासाठी शनिवारची पूर्ण रात्र जागून काढली. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास नर्स बाजूच्या रुग्णाला सुई लावण्यासाठी गेल्या. एवढ्यात संधी साधत चोरट्याने भरलेल्या इंजेक्शनवर डल्ला मारत पळ काढला. हा प्रकार जिल्हा रुग्णालयातील न्यू लेबर वाॅर्डमध्ये घडला. यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून इंजेक्शनही जप्त केले आहेत.
रहमान खान लियाकत खान (वय ३० रा.धांडेनगर, बीड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इंजेक्शन चोराचे नाव आहे. रहमान हा शनिवारी रात्रीपासूनच वॉर्ड क्रमांक २ व ३ परिसरात चकरा मारत होता. रात्री २ वाजता न्यू लेबर वॉर्डमध्ये कर्तव्यास जाणाऱ्या परिचारिका अश्विनी गवते यांनाही तो दिसला होता. गवते यांच्या वॉर्डमध्ये १६ इंजेक्शन आले होते. अगोदरच ५ इंजेक्शन दिले होते. ११ बाकी असल्याने त्या रुग्णांना इंजेक्शन देण्याचे काम करत होत्या. एवढ्यात एका रुग्णाच्या हाताला सलाईन लावलेली सुई बंद (कॅथआऊट) पडली. त्यामुळे त्या रुग्णाला त्रास होत होता. ती सुई बदलण्यासाठी गवते यांनी उपचार करणाऱ्या औषधांची ट्रॉली बाजूला करत तत्काळ रुग्णाकडे धाव घेतली. यासाठी त्यांना पाच ते १० मिनिटांचा वेळ लागला. हीच संधी साधत हा रहमान त्या ट्रॉलीजवळ आला आणि तेथील इंजेक्शन उचलून क्षणात दिसेनासा झाला. गवते या परत येऊन इतर रुग्णांना इंजेक्शन देत होत्या. शेवटी त्यांना एक इंजेक्शन दिसले नाही. त्यांनी स्टोअर रुमसह वॉर्डमधील इतरांनाही चौकशी केली. परंतु कोठेच नव्हते. अखेर काही लोकांनी पिवळ्या कपड्यात आलेल्या रहमानला संशयितरित्या पळताना पाहिले. हे समजताच गवते यांनी तत्काळ कॉलमनमार्फत वरिष्ठांना माहिती दिली. नंतर सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही तक्रार दिली.
दरम्यान, आरोग्य विभागाने पत्र देताच पोलिसांनी संशयित असलेल्या रहमानचा शोध घेतला. त्याला खाक्या दाखविताच त्याने चोरलेले तीन इंजेक्शन आणून पाेलिसांना दिले. यातील दोन इंजेक्शन रिकामे होते तर एक भरलेले होते. तो सध्या बीड शहर पाेलिसांच्या ताब्यात असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकाराने मात्र खळबळ उडाली आहे.
रहमान वॉर्डात गेलाच का?
रहमान खान याचा न्यू लेबर वॉर्डमध्ये ओळखीचा एकही रुग्ण नव्हता. तो या वाॅर्डामध्ये गेलाच का? असा सवाल उपस्थित होत आहे. रात्री १२ नंतर रेमडेसिविर इंजेक्शन येण्याची वेळ असल्याचे त्याला माहिती असल्यानेच त्याने पाळत ठेवून इंजेक्शनवर डल्ला मारल्याचा संशय आहे. पाेलीस चौकशीतूनच खरा प्रकार समोर येणार आहे.
वॉर्ड क्रमांक ३ मधूनही २ रिकामे इंजेक्शन चोरी
गवते यांनी भरलेले इंजेक्शन चोरी झाल्याची माहिती बाजूच्या वॉर्डामध्ये सांगितली. त्यानंतर वॉर्ड क्रमांक तीन मधील परिचारिकांनीही आपल्या वॉर्डमधून दोन रिकामे इंजेक्शन चोरी गेल्याचे सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार याच वॉर्डमध्ये रहमानच्या मित्राची पत्नी असून उपचार घेत आहे. तिला भेटण्यासाठीच तो तेथे गेल्याचा संशय आहे, परंतु याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
इंजेक्शन देण्याची वेळ बदलावी
सध्या रेमडेसिविर आणि कोरोना लस हा सामान्यांसाठी जीवन मरणाचा विषय बनला आहे. इंजेक्शन मिळविण्यासाठी हाल होत आहेत. जिल्हा रुग्णालयातील रुग्णाला हे इंजेक्शन मिळते. परंतु त्यांना ते देण्याची वेळ खूपच चुकीची आहे. दिवसा इंजेक्शन दिल्यास चोरी होण्यासह त्यांची सुरक्षितता अबाधित राहील. रात्री १२ नंतर इंजेक्शन दिले जात असल्यानेच असे प्रकार घडत असून ती वेळ बदलावी, अशी मागणी होत आहे.
...
इंजेक्शन चोरी झाल्याचे स्टाफने कळविताच पोलिसांना पत्र दिले आहे. इंजेक्शन आणि संबंधित व्यक्ती ताब्यात घेतला असे पोलिसांनी तोंडी सांगितले आहे. आता पुढील कारवाई होईल.
-डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
...
रहमान खान या तरुणाकडून तीन इंजेक्शन जप्त केलेे असून एक भरलेले आहे. आरोग्य विभागाने पत्र दिले असले तरी अद्याप फिर्याद देण्यासाठी कोणीच आलेले नाही. आरोपीने इंजेक्शन कोठून आणले आणि कशासाठी चोरले, हे तपासातूनच समोर येईल.
-मुस्ताफा शेख, सहायक पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड.