बँकांमधील गर्दीचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:02+5:302021-05-05T04:55:02+5:30

बीड : कोरोना लॉकडाऊनमुळे शासनाने प्रतिबंध घातले आहेत. बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार बँकांकडून ...

What to do with the crowds in the banks? | बँकांमधील गर्दीचे करायचे काय?

बँकांमधील गर्दीचे करायचे काय?

Next

बीड : कोरोना लॉकडाऊनमुळे शासनाने प्रतिबंध घातले आहेत. बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार बँकांकडून आवश्यक ते उपाय केले जात असले तरी ग्राहक मात्र आपले काम लवकर कधी होईल, यासाठी कोरोना नियमांचे भान विसरत गर्दी करताना दिसून येत आहेत. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमध्ये दररोजच्या या स्थितीमुळे बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना भीतीयुक्त वातावरणात काम करावे लागत आहे.

ग्राहकांनी आपले व्यवहार ऑनलाइन तसेच डिजिटल पद्धतीने करण्याचे आवाहन प्रशासन व बँकांकडून वारंवार केले जात असले तरी बहुतांश ग्राहकांना प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार केल्याशिवाय जमतच नाही, अशी स्थिती आहे. तर अनेक ग्राहकांकडे पुरेशा तांत्रिक सुविधा नसल्याने तसेच ग्राहक सेवा केंद्रांकडून समाधानकारक सेवा मिळत नसल्याने ते बँकेत येतात. खात्यात होणारे शासकीय अनुदान, नवीन खाते उघडणे, शिष्यवृत्तीची जमा रक्कम, पासबुकवरील नोंदी व खाते अपडेट करणे तसेच इतर कामांसाठी ग्राहक बँक सुरू होण्याच्या एक तास आधीपासूनच गर्दी करत असल्याचे दिसून आले.

------

मुलगा बांधकाम मजुरीला गेला आहे. त्याचे अनुदान जमा झाले का? नातवाची शिष्यवृत्ती जमा झाली का? सुनेचे खाते या सर्वच कामांसाठी मी नातवासोबत आले आहे. गर्दीमुळे काम होण्याची वाट पाहावी लागते.

-शेख सुलताना, जुम्मा पेठा, बीड.

---------

माझे पेन्शनचे खाते आहे. किराणावाल्याची उधारी व इतर देणी द्यायची आहे. ते थांबणार कसे, घरप्रपंचासाठी लागणारा खर्च या पैशातून करतो. ते काढण्यासाठी बँकेत आलो आहे. एक तासापासून काळजी घेऊन रांगेत उभा आहे. मजबुरीपुढे भीती कसली आली.

-मोहन गिराम, बार्शी रोड, बीड.

------------

कोरोनामुळे बाजार बंद आहे. रोजगार थांबला आहे. घर तर चालवायचे आहे. खर्चासाठी बँकेतील जमा पैसे काढायला आलो आहे. सोमवारी खूप गर्दी झाली होती, त्यामुळे मी परत गेलो. आज गर्दी आहे; पण ती कमी असल्याने काम हाेईल.

-बाबासाहेब माने, एमआयडीसी रोड.

-----------

गर्दी नियंत्रणासाठी आम्ही दोन गार्ड नियुक्त केले आहेत. सोशल डिस्टन्स व कोरोना नियमांचा अंमल होण्यासाठी ते कार्यरत आहेत. बँकेत सॅनिटायझेशन मशीन ठेवली आहे. याशिवाय मशीन चलत नसेल तर एक स्वतंत्र गार्ड सॅनिटाइझ करण्यासाठी नियुक्त आहे. विनामास्क कोणालाही प्रवेश दिला जात नाही. येणारे ग्राहक नियम पाळत नसल्याचे दिसल्यास काम थांबवतो. कारण जीवन सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. शाखेतील अधिकारी , कर्मचाऱ्यांचाही फॉलोअप घेतला जातो. संसर्ग टाळण्यासाठी शासनाचे नियम पाळून नागरिकांनी बँक प्रशासनाला सहकार्य करावे.

-आनंदकुमार, मुख्य प्रबंधक, एसबीआय, जालना रोड शाखा.

--------------

ग्रामीण भागातील ग्राहकांना गावातील ग्राहक सेवा केंद्रातून व्यवहार करण्याचे सुचविले आहे. सध्या ग्राहकांची गर्दी कमी आहे. सुटीनंतरच्या दिवशी गर्दी होते. आमचे कर्मचारी जिवावर उदार होऊन योग्य ती काळजी घेत ग्राहक सेवा देत आहेत. सुरक्षा रक्षक नेमणार आहोत. वेळ पडल्यास पोलीस मदत घेण्याबाबत अग्रणी बँक व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार उपाय केले जातील.

-नरसिंग लटपटे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया.

----------

ग्राहकांना कोरानाचा विसर (सेंट्रल बँक)

कोराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकेकडून सोशल डिस्टन्सनुसार ग्राहकांना उभे राहण्यासाठी गोल मार्किंग केलेले आहेत. मात्र, तेथे ग्राहक दिसून आले नाहीत. बँकेत प्रवेशद्वारातून कोणीही सहज प्रवेश करत होते. काउंटरसमोर उभे असलेल्या ग्राहकांमध्ये कसलेच अंतर नव्हते. कॅशिअर कॅबिनसमोरही गर्दी दिसून आली. जागा अपुरी असल्याने अडचणी होत्या. कर्मचारी आवाहन करूनही ग्राहक आपल्या कामासाठी गर्दीतच उभे होते.

--------------

सुरक्षारक्षकांची कसरत (एसबीआय)

जालना रोडवरील एसबीआय शाखेचा बाह्य परिसर मोठा असल्याने प्रवेशद्वारापासूनची रांग रस्त्यापर्यंत दिसून आली. यातच वाहनेही मोठ्या प्रामणात पार्किंग केलेली होती. रांगेतील प्रत्येक ग्राहकामधील अंतर ठेवण्यासाठी तसेच गर्दी नियंत्रण करताना सुरक्षारक्षकांची कसरत होताना पहाायला मिळाली. प्रवेशानंतर सॅनिटायझरची व्यवस्था केलेली होती. मोजक्या ग्राहकांनाच प्रवेश दिला जात असल्याने काउंटरसमोरील गर्दी कमी होती. मात्र बाहेरची गर्दी इथे नेहमीच असते.

-----

===Photopath===

040521\04bed_1_04052021_14.jpg~040521\04bed_3_04052021_14.jpg

===Caption===

बँकांमधील गर्दीचे करायचे काय? ~बँकांमधील गर्दीचे करायचे काय? 

Web Title: What to do with the crowds in the banks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.