अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:25+5:302021-04-07T04:34:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाचा फटका जेवढा व्यापार, अर्थव्यवस्था आदीला बसला आहे, तेवढाच सामाजिक संघटनांनाही बसला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाचा फटका जेवढा व्यापार, अर्थव्यवस्था आदीला बसला आहे, तेवढाच सामाजिक संघटनांनाही बसला आहे. अनाथ मुलांचा सांभाळ करताना त्यांना रोज नव्या संकंटांना तोंड द्यावे लागत आहे. रोज लागणारा किराणा, भाजीपाला, धान्य यासाठी रोज एका दात्याकडे धाव घ्यावी लागत आहे. सध्या या संचालकांसह मुलांवर उपासमारीची वेळ आली असून दात्यांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन केले जात आहे.
जिल्ह्यात शासकीय मान्यता असलेल्या चार संस्था आहेत. आर्वीला मयूरी व दीपक नागरगाेजे यांचे शांतीवन, गेवराईत प्रीती व संतोष गर्जे यांचे सहारा अनाथालय, पाली येथे संध्या व दत्ता बारगजे यांचे इन्फंट इंडिया, शिरूर तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब येथे मयूरी व सुरेश राजहंस यांचे सेवाश्रम अशी चार अनाथालये सध्या मुलांना आधार देऊन त्यांचे पालन पोषण करीत आहेत. गतवर्षीपासून या लोकांचे हाल सुरू आहेत.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये तरी काही लोकांनी माणुसकीच्या दृष्टीने धाव घेत या संस्थांना मदत केली होती. परंतु आता वर्षापासून दान करणारे लाेकच घरात आहेत. त्यामुळे त्यांचीच अडचण निर्माण झाल्याने ते दान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. सध्या तर या संस्थाचालकांना रोज एकाचे दार गाठावे लागत आहे. इतर मदत नाही मिळाली तरी दररोज लागणारा किराणा, भाजीपाला, धान्य हे मिळविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. यात मुलांवरही उपासमारीची वेळ आली असून दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
सहारा अनाथालय, गेवराई
गेवराई शहरापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर हे अनाथालय आहे. येथे तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकरी, लालबत्तीमधील महिलांची मुले आणि पूर्णत: अनाथ असलेल्या मुलांचा प्रीती व संतोष गर्जे हे दाम्पत्य सांभाळ करतात.
शांतीवण, आर्वी
शिरूर तालुक्यातील आर्वी येथे ही संस्था आहे. कावेरी व दीपक नागरगाेजे येथे संचालक असून आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ, ऊसताेड कामगार यांच्या मुलांचा येथे सांभाळ केला जाताे. त्यांचे पालन, पोषण केले जाते.
इन्फंट इंडिया, पाली
बीडपासून अवघ्या ८ कि.मी.अंतरावर पाली येथील उंच डोंगरावर ही संस्था आहे. येथे केवळ एचआयव्हीबाधीत मुलांचा आणि नागरिकांचा सांभाळ संध्या व दत्ता बारगजे हे दाम्पत्य करतात.
सेवाश्रम, ब्रम्हनाथ येळंब, शिरूर
शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे ही संस्था कार्यान्वित आहे. मयूरी व सुरेश राजहंस हे दाम्पत्य येथे संचालक आहेत. तमाशा कलावंतांच्या मुलांचा ायेथे सांभाळ केला जातो. मागील वर्षासह चालू वर्षातही येथील मुलांचा सांभाळ करताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये तरी लोक थोडीफार मदत करत होते परंतु आता तेच अडचणीत असल्याने आम्हाला मदत करताना आखडता हात घेत आहेत. किराणा, भाजीपाला, दवाखाना या गरजा भागविण्यासाठी सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. आम्हाला मदत करावी, एवढीच मागणी आहे.
-संतोष गर्जे गेवराई
कोरोनामुळे खूपच हाल सुरू आहेत. संस्थेत अडचणी आहेत, पण आम्हालाही कोणाकडे जाता येत नाही आणि बाहेरच्यांनाही संसर्गाच्या भीतीने येता येत नाही. त्यामुळे सगळीकडूनच मरण आले आहे. धान्य, भाजीपाला, किराणा यासाठी थोडीफार मदत मिळते, त्यातूनच सध्या भागविले जात आहे.
-सुरेश राजहंस, ब्रह्मनाथ येळंब
===Photopath===
060421\062_bed_15_06042021_14.jpeg
===Caption===
गेवराई येथील सहारा अनाथालयातील धुलीवंदनाच्या दिवशीचे छायाचित्र.