शिवसेनेत चाललंय काय? पदाधिकाऱ्यांवरच होताहेत जीवघेणे हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:16+5:302021-09-02T05:11:16+5:30
बीड : मागील दोन महिन्यांपासून सत्ताधारी शिवसेना पक्षात वाद वाढले आहेत. ते अंतर्गत असले तरी जिवाशी खेळणार आहेत. माजलगावात ...
बीड : मागील दोन महिन्यांपासून सत्ताधारी शिवसेना पक्षात वाद वाढले आहेत. ते अंतर्गत असले तरी जिवाशी खेळणार आहेत. माजलगावात शहरप्रमुख,ल, तर बीडमध्ये उपजिल्हाप्रमुख या मुख्य पदाधिकाऱ्यांवरच हल्ले झाले आहेत. यात जिल्हाप्रमुखांवरच थेट आरोप केले आहेत. त्यामुळे बीडच्या शिवसेनेत चाललंय काय? अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे.
जिल्ह्यात जिल्हाप्रमुख म्हणून कुंडलिक खांडे आणि आप्पासाहेब जाधव या दोघांवर जबाबदारी आहे. जाधव यांची काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली असून सचिन मुळूक यांना बाजूला करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्यावर विश्वास दाखविला होता. परंतु, पहिल्याच मिरवणुकीत माजलगावात राडा झाला. शहरप्रमुख पापा सोळंके यांना जाधव यांच्या भावासह कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात साखळी, दांड्याने मारहाण केली होती. ही धग कायम असतानाच चार दिवसांपूर्वी संपर्कप्रमुख तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांनी जिल्हाप्रमुख सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमवारी त्यांच्यावर भवानवाडी (ता.बीड) येथून बीडकडे येताना पुलावर अडवून तलवारीने हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाले. जगताप यांच्या नातेवाइकांनी या हल्यात कुंडलिक खांडेचाच हात असल्याचा आरोप केला आहे. खुद्द जगताप यांनीही आपण बैठकीत बोलण्यानेच हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करीत अप्रत्यक्ष जिल्हाप्रमुख खांडेवर आरोप केला आहे. या दोन्ही हल्ल्यांमुळे शिवसेना जिल्हाप्रमुख चांगलेच वादग्रस्त ठरले आहेत.
--
अंतर्गत वाद पक्षासाठी अडचणीचे
शिवसेनेतील अंतर्गत राजकारण येणाऱ्या पालिका व नगर पंचायत निवडणुकीत पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते. संघटनात्मक बांधणीसाठी मंत्र्यांचे, नेत्यांचे दौरे होत असले तरी हे संघटन मजबूत झाल्याचे दिसत नाही. गटतट वाढल्यानेच थेट बैठकीतच पदााधिकारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याचे उघड झाले आहे.
---
हल्ल्यामागे राष्ट्रवादीचा हात - खांडे
कुटुंबप्रमुख म्हणून मला पोहोचायला उशिर झाला होता. त्यामुळे नातेवाइकांना भावना अनावर झाल्याने त्यांनी हे आरोप केले. परंतु, त्यांच्या पत्नीने यात राष्ट्रवादीच्या लोकांचाच हात असल्याचे सांगितले आहे. मला पण वाटते हा हल्ला राष्ट्रवादीनेच केला असून यातील आरोपी शोधावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी सांगितले.
--
आमचा काय संबंध : आ. क्षीरसागर
खांडे यांनी राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना संपर्क केला. त्यांनी या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. जे आहे ते पोलीस तपासातून उघड होणारच आहे, असे त्यांनी सांगितले.