मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:59+5:302021-06-09T04:40:59+5:30
बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत गेला आणि तिसऱ्या टप्प्यात बीडचा समावेश झाल्याने जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. ...
बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत गेला आणि तिसऱ्या टप्प्यात बीडचा समावेश झाल्याने जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून मोबाइलच्या दुकानांत दुरुस्ती तसेच ॲक्सेसरिज, मोबाइल खरेदीसाठी गर्दी दिसून आली. मात्र बहुतांश ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी सर्व प्रकारची दक्षता घेत व्यवहार सुरू होते. या दुकानांतील गर्दी पाहून अनेक ग्राहकांनी मोबाइल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, अशी मानसिकता करत तूर्त खरेदी करण्याचे टाळले.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस उद्रेक वाढत गेला. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत गेली. परिणामी प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागल्या. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध लादण्यात आले त्यामुळे दोन महिने दुकाने बंद होती. लॉकडाऊन काळात मोबाइलआधारेच अनेकांना आपली विविध कामे करता आली. ऑनलाइन व्यवहार, ऑनलाइन शिक्षण घेता आले; परंतु मोबाइल वापरताना अनेक अडचणी आल्या. दुरुस्तीसाठी दुकाने बंद होती. त्यामुळे लागणारे साहित्य खरेदी करता आले नाही. अखेर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दररोजच्या वापरात अतिमहत्त्वाचे साधन असलेल्या मोबाइलच्या दुकानांवर नवीन खरेदीसह दुरुस्ती व ॲक्सेसरिज खरेदीसाठी कोरोनाचे भान विसरून ग्राहकांची गर्दी दिसून आली.
कशासाठी गर्दी
मोबाइलची बॅटरी फुगणे, मोबाइल हँग होणे, संपर्क सुरू असताना अचानक बंद होणे, चार्जर खराब होणे, चार्जरचे केबल खराब होणे, कॉम्बो, स्क्रीन गार्ड, मोबाइल कव्हर, हेडफोन, डिस्प्ले खरेदी तसेच मोबाइल बॉडी बदलण्यासाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली.
दोन महिन्यांपासून बाजार बंद
गेल्या दोन महिन्यांपासून ॲक्सेसरिज आणि मोबाइलची दुकाने बंद असल्यामुळे ग्राहकांना अडचणी आल्या. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात मोबाइल विक्री, दुरुस्ती आणि सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची संख्या जवळपास दोन हजारांच्या घरात आहे. या दुकानांवर किमान दोन जणांना रोजगार मिळतो. जवळपास पाच हजार जणांचा रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र लॉकडाऊनमुळे दोन महिने रोजगाराला फटका बसला.
-------------
माझ्या मोबाइलची बॅटरी आणि डिस्प्ले खराब झाल्याने महिनाभराआधीच बिघडला. पण दुकाने बंद असल्याने घरातला साधा फोन वापरावा लागला. दुकाने उघडल्याने दुरुस्तीसाठी गेलो तर गर्दी दिसून आली. त्यामुळे दुकानात जायचे टाळून परतलो. - इंद्रजित जाधव
--------------
जुना मोबाइल खराब झाल्याने दुरुस्त करायचा हाेता. तसेच नवा ॲन्ड्राॅइड माेबाइल घ्यायचा होता. मात्र दोन महिन्यांपासून घेता आला नाही. दुकाने उघडल्याने आधी जुना मोबाइल दुरुस्त करून घेतला. कोरोनाबाबत मी दक्ष होतो. - अनिकेत वडमारे, बीड
----------
लॉकडाऊनमुळे दोन महिने दुकान बंद होते. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला. दुकान उघडल्यानंतर चार्जर केबल, डिस्प्ले, कॉम्बोला मागणी होती. दुकानात आमच्यासह ग्राहकांना मास्क अनिवार्य केले आहे. सॅनिटायझरचा वापर करतो. सोशल डिस्टन्सही पाळले जाते. - बुधाराम विष्णोई, व्यापारी, बीड
-----------
लॉकडाऊनमुळे मोबाइल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता दुकाने उघडली आहेत. ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच आवश्यक ते साहित्य, मोबाइल खरेदी केल्यास येथील बाजारपेठेला बळ मिळेल. कोराना नियमांचे पालन करून ग्राहकांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. - नवनाथ बागलाणे, व्यापारी, बीड
-----
मोबाइल रिपेअरिंगचे काम करून दिवसाकाठी २५० रुपये मिळायचे. लॉकडाऊनमुळे दोन महिने माझ्यासाठी अत्यंत वाईट गेले. आता पुन्हा काम सुरू केले आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर तसेच साेशल डिस्टन्सिंन पाळतो. ग्राहकही मास्क वापरत आहेत. - ज्ञानेश्वर घोरपडे, बीड
----------
दोन महिने रिपेअरिंगचे काम बंद होते. त्यामुळे गावाकडे शेतातील कामे केली. सोमवारपासन पुन्हा काम सुरू केले आहे. ओव्हर चार्जिंगमुळे बॅटरी फुगणे, आयसी बॉडी डॅमेज होणे, डिस्प्ले दुरुस्तीची कामे येत आहेत. - सुशांत खंदारे, बीड