कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू

By शिरीष शिंदे | Published: July 1, 2024 07:06 PM2024-07-01T19:06:04+5:302024-07-01T19:06:49+5:30

ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी उपाय

What if there is less rain? Beed District Administration started work, planning till June 2025 | कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू

कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू

बीड : जिल्ह्यात सध्या पाणीटंचाई असल्यामुळे सध्या २७७ टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काळात मोठे पाऊस होऊन धरणे भरतील अशी शक्यता आहे. जर कमी पाऊस झाला तर ऐनवेळी टेंडर काढून कंत्राटदार प्रक्रियेस वेळ लागू शकतो. त्यामुळे पुढील उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने दि. ३० जून २०२५ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खासगी टँकर पुरवठा कंत्राटासाठी निविदा काढण्यात आली आहे.

जून महिना सुरू झाला तर अद्यापही धरणे कोरडीच आहे. मूर पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी सर्वच्या सर्व धरणे भरणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे तीन महिने अद्याप बाकी आहे. या कालावधीत चांगला पाऊस होऊन परिस्थिती पूर्णत: बदलून जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात जवळपास मार्च महिन्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. ३० जूनअखेरपर्यंत बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांना आणि वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांकडून फेर ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. 

तसेच ई-निविदा भरण्यास दि. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली होती, तर ५ सप्टेंबर २०२३ रोजी सदरील निविदा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या विरोधात एकाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर निर्णय झाल्यानंतर टँकर सुरू झाले होते. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यास टँकरची आवश्यकता लागणार नाही, असे अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले होते. जूनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील पाणीपातळी वाढली. परिणामी, टँकरची संख्या निम्म्यावर आली आहे. दि. ७ जून रोजी बीड जिल्ह्यात ४६७ टँकर सुरू होते, तर २७ जून रोजीच्या अहवालानुसार २७७ टँकर सुरू आहेत. चांगला पाऊस झाल्याने तब्बल १९० टँकर टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात आले आहेत.

निविदा पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ
सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा टँकर कंत्राटदारास दि. ३० जूनपर्यंत मुदत होती. चांगला पाऊस झाल्याने टँकर बंद होतील अशी शक्यता होती. परंतु अद्यापही टँकर सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात २७७ टँकर सुरू आहेत, पाण्याची अडचण लक्षात घेता सध्या सुरू असलेल्या टेंडरधारकाची टँकर पुरवठ्याची मुदत दि. ३० जूनची असली तरी नवीन टँकरसाठी काढलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत जुन्याच कंत्राटदाराकडून जुन्या दरानुसार टँकर सुरू राहणार आहेत.

असा आहे निविदेचा कालावधी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. ३० जून २०२५ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खासगी टँकर पुरवठा कंत्राटदारासाठी निविदा काढण्यात आली आहे. दि. २५ जून ते १६ जुलै या कालावधीत निविदा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जातील. त्यानंतर दि. १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता निविदा खुल्या केल्या जातील.

अडीचशेपेक्षा अधिक टँकर सुरू
जिल्ह्यात सध्या अडीचशेपेक्षा अधिक टँकर सुरू आहेत. ग्रामीण भागातील लाेकांची पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असलेल्या कंत्राटदारास नवीन टँकर निविदाप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टँकर पुरवठ्याचे पत्र दिले आहे.
-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

Web Title: What if there is less rain? Beed District Administration started work, planning till June 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.