दिग्गज नेते प्रचारापासून अलिप्त! बीड मतदारसंघात क्षीरसागर, मस्के, मुळूक यांची भूमिका काय?
By सोमनाथ खताळ | Published: November 12, 2024 05:50 PM2024-11-12T17:50:57+5:302024-11-12T17:51:18+5:30
आघाडीत मस्के, तर मुळूक युतीत असतानाही उमदेवारांच्या प्रचारात फारसे सक्रिय नाहीत
बीड :बीड मतदारसंघाचा प्रचार गतिमान झाला आहे. यासोबतच प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला; परंतु निवडणुकीतील भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही, तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटात प्रवेश केलेले राजेंद्र मस्के हेदेखील आपल्या उमेदवारांसोबत प्रचार करताना फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे यांची भूमिका काय? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. क्षीरसागर यांची बैठक झाली आहे, तर मस्के यांनी १२ नोव्हेंबरला तातडीची बैठक घेणार आहेत.
बीड मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे डॉ. योगेश क्षीरसागर, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, तिसऱ्या आघाडीकडून कुंडलिक खांडे आणि अपक्ष म्हणून अनिल जगताप यांच्यासह इतर उमेदवार मैदानात आहेत. सध्या हे सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही अचानक अर्ज मागे घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. आता ते कोणाला पाठिंबा देणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या हाेत्या. मागील दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून भूमिका जाहीर करा, असा आग्रह क्षीरसागर यांच्याकडे केला जात आहे. त्यामुळे त्यांनी प्रमुख लोकांसोबत बैठक घेतली. इतरही काही लोकांसोबत बैठक घेतली. परंतु सोमवारी दुपारपर्यंत त्यांनी भूमिका जाहीर केली नव्हती.
कोणत्या पुतण्याला देणार पाठिंबा?
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दोन्ही पुतणे संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर कोणत्या पुतण्याला पाठिंबा देणार? की तटस्थ राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजेंद्र मस्केंनी बोलावली बैठक
जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमधून बाहेर पडत शरद पवार गटात प्रवेश केलेल्या राजेंद्र मस्के यांनीही बंडखोरी करत जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु नंतर तो मागे घेतला. असे असले तरी ते सध्या प्रचारात सक्रिय नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मात्र त्यांनी एका ठिकाणी भेट घेत स्वागतही केले. आता मंगळवारी त्यांनी प्रमुख लोकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या ठिकाणाहून ते भूमिका जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सचिन मुळूक यांची अडचण
बीडची जागा शिवसेनेला असायची. परंतु यावेळी ती राष्ट्रवादीला गेली. डॉ.योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बंडखोरी केली, तर दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे अद्यापही महायुतीचे उमेदवार असलेल्या क्षीरसागरांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने सक्रिय नाहीत. एकीकडे पक्ष म्हणून क्षीरसागरांचा प्रचार करायचा की मित्र म्हणून अनिल जगताप यांना पाठबळ द्यायचे, अशी अडचण मुळूक यांच्यासमोर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.