तुमच्या उमेदवाराचे शिक्षण किती? कुणी मजुरी करतोय, तर कुणी समाजसेवा
By अनिल भंडारी | Published: May 9, 2024 07:52 PM2024-05-09T19:52:35+5:302024-05-09T19:56:10+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वांत जास्त
बीड : येत्या १३ मे रोजी होणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ४१ उमेदवार मैदानात आहेत. या उमेदवारांमध्ये कुणी अशिक्षित, कुणी तिसरी पास, बारावी पास, तर कुणी उच्चशिक्षित आहेत. काही जण व्यवसायात आहेत, तर काही जण राजकारण, समाजसेवेत कार्यरत आहेत.
बीड मतदारसंघात राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील, मान्यताप्राप्त पक्षाचे तीन उमेदवार आहेत, तर नऊ उमेदवार हे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय आहेत, तर २९ उमेदवार अपक्ष आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वांत जास्त असल्याने सामाजिक पातळीवर तर्कवितर्क लावून चर्चा रंगत आहेत. उमेदवारांचे शिक्षण किती? त्यांची सामाजिक, राजकीय ताकद किती यावरही चर्चा झडत आहे.
भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे या बीएस्सी पदवीधर आहेत, तर राकाँ शरद पवार पक्ष महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे कला पदवीधर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांचे शिक्षण डीसीई, एमए (इतिहास), बसपाचे डॉ. सिद्धार्थ टाकणकर यांचे शिक्षण एमए पीचडी आहे. बहुजन महापार्टीचे अशोक भागोजी थोरात हे दहावी पास आहेत. स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा धनंजय मुंडे यांचे शिक्षण संगीत कला प्रवेशिकापर्यंत झाले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे चंद्रकांतकुमार हजारे बीए उत्तीर्ण आहेत. टिपू सुल्तान पार्टीचे जावेद सलीम सय्यद नववी पास आहेत. आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टीचे महेंद्र ताटे हे बीएस्सी पदवीधर आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे ॲड. माणिक बन्सी आदमाने यांचे शिक्षण एलएलएम आहे. ऑल इंडिया नॅशनल रक्षा सेनेचे ॲड. शरद बहिणाजी कांबळे हे एमए इंग्रजी, तसेच विधि पदवीधर आहेत. प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे शेषेराव चोखोबा वीर हे बीकॉम आहेत.
अपक्ष उमेदवार
गणेश कसपटे यांचे शिक्षण एमए (इंग्रजी) आहे. ॲड. गणेश करांडे यांनी बीए, बीजे, एमबीए व एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. गफ्फारखान जब्बारखान पठाण हे नववी पास आहेत. गोकुळ बापूराव सवासे अकरावी पास आहेत. जावेद सिकंद मोमीन नववी पास आहेत. दत्ता गायकवाड बीकॉम आहेत. प्रकाश भगवान सोळंके हे सहावी पास आहेत. भास्कर बन्सीधर खांडे बीए बीएएसआय आहेत. मुबीन जुबेरी जहीर उल अफाक व नाजेमखान जब्बारखान पठाण यांचे शिक्षण समजू शकले नाही. मुस्तफा मैनोद्दीन शेख हे ११ वी पास आहेत. रहेमान बाहोद्दीन सय्यद दहावी पास आहेत. राजेंद्र होके यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेत झाले आहे. लक्ष्मीबाई माेरे या तिसरी उत्तीर्ण असून, वचिष्ठ उद्धव कुटे यांचे शिक्षण बीए अर्थशास्त्र झाले आहे. वसीम शेख सलीम शेख आठवी पास आहेत. शीतल शिवाजी धोंडरे या बीए आहेत. शेख एजाज शेख उमर यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शेख तौसीफ अब्दुल सत्तार एमए आहेत. शेख याशेद शे. तय्यब बीए आहेत. डॉ. श्रीराम विठ्ठल खळगे डीएचएमएस आहेत. सतीश कापसे यांचे शिक्षण बीए झाले आहे. समशेरखान साहेबखान पठाण यांचे शिक्षण निरंक आहे. सय्यद मिनहाजअली बारावी, तर सलाउद्दीन खान पठाण चौथी पास आहेत. सलीम अल्लाबख्श सय्यद अकरावी पास आहेत. सादेक इब्राहिम शेख नववी पास आहेत. सुलेमा खैरोद्दीन महंमद सहावी पास, तर हिदायत सादेखअली सय्यद दहावी उत्तीर्ण आहेत.
अंबाजोगाई, माजलगाव, परळीचे उमेदवार
प्रमुख पक्षांचे उमेदवार वगळता इतर उमेदवार हे अंबाजोगाई, माजलगाव, परळी आणि बीड भागातील आहेत. इतर पक्ष व अपक्षांमधील बहुतांश उमेदवार प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतात. यंदाच्या लोकसभेला बीड जिल्ह्यात २१ लाख ४२ हजार ५४७ मतदार आहेत. एकूण वैध मतांच्या १/६ मते मिळाली, तरच उमेदवाराची अनामत शाबूत राहते, नसता ती जप्त होते. त्यामुळे हे उमदेवार किती मते घेतात, यावरच त्यांच्या अनामतीचे भविष्य अवलंबून आहे.