बीडमध्ये सावळा गाेंधळ; बालरोग तज्ज्ञाची नियूक्ती माजलगावात अन् काम करताहेत गेवराईत
By सोमनाथ खताळ | Published: February 4, 2023 04:06 PM2023-02-04T16:06:53+5:302023-02-04T16:09:01+5:30
अरे बीडच्या आरोग्य विभागात चाललंय काय? माजलगावला बालरोग तज्ज्ञाविनाच प्रसूती अन् गेवराईला दोघे असतानाही तिसऱ्याची प्रतिनियूक्ती
- सोमनाथ खताळ
बीड : आराेग्य विभागात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. माजलगाव ग्रामीण रूग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने एकाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली. परंतू हे डॉक्टर माजलगावऐवजी कसलाही लेखी आदेश नसताना गेवराईत काम करत आहेत. विशेष म्हणजे गेवराईला आगोदरच दोन बालरोग तज्ज्ञ कार्यरत आहेत. माजलगावला वाऱ्यावर सोडून गेवराईवर एवढे प्रेम का? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या तरी माजलगावात बालरोग तज्ज्ञाविनाच प्रसूती होत असल्याचे सांगण्यात आले.
प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात एका वैद्यकीय अधीक्षकांसह बाल, स्त्री व भूलतज्ज्ञांची नियूक्ती असते. परंतू माजलगावला भूलतज्ज्ञ नसल्याने गेवराईचे डॉ.बडे यांची प्रतिनियूक्ती केली तर बालरोग तज्ज्ञ म्हणून डॉ.प्रवीण सराफ यांची नियूक्ती झाली होती. परंतू सुरूवातीचे काही दिवस काम केल्यानंतर डॉ.सराफ हे माजलगावला फिरकलेच नाहीत. तसेच कसलाही लेखी आदेश नसताना केवळ तोंडी आदेश असल्याचे सांगत ते गेवराईला मागील महिनाभरापासून काम करत आहेत. विशेष म्हणजे गेवराईला आगोदरच दोन बालरोग तज्ज्ञ कार्यरत आहेत. असे असतानाही तिसऱ्याची नियूक्ती का? असा सवाल आहे.
दरम्यान, माजलगावात सध्या बालरोगतज्ज्ञाच्या गैरहजेरीतच प्रसूती, सिझर केले जात आहेत. शासनाने ज्या उद्देशाने बालरोग तज्ज्ञाची नियूक्ती केली होती, तो उद्देश वैद्यकीय अधीक्षकांनी धुळीत मिळवला आहे. या प्रकाराने गेवराई व माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मिरा एखंडे सारखे प्रकरण झाल्यास जबाबदार कोण?
काही वर्षापूर्वी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीवेळी मिरा एखंडे या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही येथील अधिकारी सजक झाले नाहीत. आजही बालरोग तज्ज्ञ नसतानाही सीझर केले जात आहेत. प्रसुतीवेळी गुंतागुंत अथवा काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविणाऱ्या दोन्ही वैद्यकीय अधीक्षकांची चौकशी करावी, तसेच त्यांना अभय देणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
केजची नर्स बीडला, तर बीडची केज येथे
केज उपजिल्हा रूग्णालयातील एक परिचारीका जिल्हा रूग्णालयात प्रतिनियूक्तीवर आहे तर बीडमधील केजमध्ये आहेत. त्यांनाही कसलाही लेखी आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत केजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांचा संपर्क न लागल्याने बाजू समजली नाही.
कोण काय म्हणतंय...
माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रूद्रवार म्हणतात, डॉ.सराफ यांची नियूक्ती आहे. परंत त्यांनी सुरूवातीचे काही दिवस काम केल्यानंतर ते फिरकलेच नाहीत. त्यांची लेखी प्रतिनियूक्ती कोठेही नाही. ते येत नसल्याचे आम्ही वरिष्ठांना कळविले आहे, परंतू त्याची तारीख आठवत नाही असे सांगितले. तसेच सध्या माणुसकीने इतर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचेही त्यांनी मान्य केले. गेवराईचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले, आमच्याकडे दोन नियमित बालरोग तज्ज्ञ आहेत. डॉ.सराफ हे देखील गेवराईतच काम करत आहेत. त्यांची लेखी ऑर्डर नाही, हे खरे आहे. आता याबाबत मी जास्त बोलू शकत नाही, वरिष्ठांना विचारावे. तर डॉ.प्रवीण सराफ म्हणाले, मला लेखी नव्हे पण प्रशासनाने तोंडी आदेश दिले आहेत. त्यावरून मी गेवराईला काम करत आहे.