गहू खरेदीचा करार; तिघांकडून ६० लाखाला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:50 PM2019-11-29T23:50:09+5:302019-11-29T23:50:56+5:30
एक वर्षापूर्वी गहू खरेदीचा लेखी करार केला असून, यापोटी वेळोवेळी टप्प्याटप्प्यात साठ लाख रुपये घेतले. याउपरही करार पूर्ण न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ईश्वर शिंगटे (रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात दोन दलाल व करारदार असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडा : एक वर्षापूर्वी गहू खरेदीचा लेखी करार केला असून, यापोटी वेळोवेळी टप्प्याटप्प्यात साठ लाख रुपये घेतले. याउपरही करार पूर्ण न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ईश्वर शिंगटे (रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात दोन दलाल व करारदार असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील विठ्ठल सोनवणे, गोरेगाव मुंबई येथील तेजन मुन्शी, या दोन दलालांच्या माध्यमातून ग्लोबलअॅग्रो इंडस्ट्रीजसाठी आष्टी येथील व्यापारी ईश्वर काशिनाथ शिंगटे यांनी इंदौर (मध्यप्रदेश) येथील विजय यादव यांच्यासोबत गहू खरेदीचा लेखी करार २० नोव्हेंबर २०१८ रोजी केला होता. त्या करारापोटी शिंगटे यांनी टप्प्याटप्प्याने चेक व आरटीईजीएसच्या माध्यमातून साठ लाख रुपये दिले होते. सदरील कराराचे पैसे देखील दोन दलालांना देण्यात आले होते. पण या दलालांनी अंधारात ठेवून परस्पर पैसे हडप केल्याचे समजताच ईश्वर शिंगटे यांच्या फिर्यादीवरुन गुरूवारी रात्री तिघांविरोधात लेखी कराराचे उल्लंघन व फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल झाला आहे. आरोपी फरार असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत मोरे करीत आहेत.
पोलिसांनी फिर्यादीला दिला कोर्टात जाण्याचा सल्ला
ईश्वर शिंगटे यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षण दिसताच त्यांनी ४ जून २०१९ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात, तर ६ जून २०१९ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात फिर्याद दिली होती.
मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करीत कसलीही कारवाई केली नाही. उलट फिर्यादीला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.