धनगर समाजाच्या जल्लोषाची तारीख कधी ? : भारत सोन्नर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:25 AM2018-11-17T11:25:10+5:302018-11-17T11:26:35+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडविणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले होते.
बीड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडविणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले होते. त्यानंतर आज चार वर्षे उलटूनही धनगर आरक्षणाचा प्रश्न या सरकारने मार्गी लावलेला नाही. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी यशवंत सेनेचे नेते भारत सोन्नर यांनी केली आहे.
धनगर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी टीस या संस्थेला या सरकारने काम दिले होते. आरक्षणाचा सर्व अभ्यास करून चार वर्षांनंतर हा अहवाल संस्थेने सरकारकडे दिला आहे. त्यांनंतरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी, एक महिना या अहवालाचा अभ्यास करून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल व याची शिफारस केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु मुख्यमंत्री यांना या गोष्टीचा विसर पडलेला दिसत आहे. केवळ केंद्र शासनाकडे अहवाल पाठविले एवढेच काम नाही तर त्याचा तात्काळ पाठपुरवठा करून धनगर आरक्षणाची अमलबजावणी झाली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन सोन्नर यांनी केले.
ज्या वेळेस धनगर समाजाला जातीचे प्रमाणपत्र हातात पडतील, त्याच वेळेस धनगर समाजाला आरक्षण मिळेल; परंतु हे सरकार केवळ चालढकल करीत आहे आगामी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा व धनगरांना जल्लोषाची तारीख सांगावी. आता धनगरांचा अंत पाहू नका, अन्यथा यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने आंदोलनाचा इशाराही भारत सोन्नर यांनी दिला