पाटी- पेन्सील धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा... - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:49+5:302021-09-07T04:39:49+5:30
बीड : दारिद्र्य, व्यसनाधीनता व दोन वेळच्या जेवणाची भ्रांत यातून पाटी - पेन्सील हाती घेण्याच्या वयात काही मुलांना भीक ...
बीड : दारिद्र्य, व्यसनाधीनता व दोन वेळच्या जेवणाची भ्रांत यातून पाटी - पेन्सील हाती घेण्याच्या वयात काही मुलांना भीक मागून जगावे लागत आहे. यामुळे त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतेच, पण गरीब - श्रीमंतीतील दरीही ठळकपणे अधोरेखित होते.
शहरातील बसस्थानक, भाजी मंडई, मुख्य बाजारपेठा व वर्दळीच्या रस्त्यांवर बालवयात भीक मागणाऱ्या मुलांची रेलचेल दिसते. या मुलांना ना हक्काचा निवारा असतो, ना शाळा, ना शिक्षण. या प्रत्येक निरागस चेहऱ्याआड ज्याची त्याची एक कहाणी दडलेली असते.
काही लेकरांना जन्मदात्यांनी वाऱ्यावर सोडलेले असते, काहींचे आई-वडील असतात. पण ते पोटच्या मुलांकडे लक्ष देत नाहीत, तर काही जण व्यसनाच्या आहारी गेल्याने मुलांना भीक मागण्यासाठी बळजबरी करतात, अशी माहिती समोर आली आहे.
.....
बसस्थानक...
बीड शहरातील बसस्थानकासमोर ५ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता जेमतेम ८ ते ९ वर्षांचा मुलगा एका जीपजवळ जाऊन भीक मागताना आढळला. रिक्षाथांब्याला चिकटून उभ्या राहणाऱ्या प्रत्येक वाहनाजवळ जाऊन तो हात पुढे करून दयायाचना करताना दिसला.
...
जालना रोड...
शहरातील जालना रोडवरील एका खासगी दवाखान्यासमोर फळांचा गाडा आहे. तेथे आईसोबत सात ते आठ वर्षांची मुलगी भीक मागताना आढळून आली. रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्या प्रत्येकासमोर जाऊन ही इवलीशी मुलगी भीकेसाठी साकडे घालत होती, तर आई तिला साथ देत होती.
...
बालकांची काळजी व संरक्षणासाठी कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे अनेक चिमुकले सर्रास भीक मागतात. त्यांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांची काळजी घेणे व संरक्षण देण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घ्यावी.
- रामहरी जाधव
चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक, बीड
....
बालके स्वत:हून कधीच भीक मागत नाहीत. त्यांना भीक मागण्यास प्रवत्त केले जाते. आई - वडील किंवा एखादी टोळीदेखील यामागे असू शकते.
रस्त्याच्या कडेला, मंदिरात, बसस्थानकात राहून गुजराण करणाऱ्या या मुलांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत.
- तत्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड
....
050921\420705bed_3_05092021_14.jpg~050921\420705bed_4_05092021_14.jpg
भीक~भीक २