सत्ता कधी असते, कधी नसते; पण सत्ता, पद गेले की अनेकांचा चेहरा पडतो: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 01:00 PM2022-10-10T13:00:58+5:302022-10-10T13:02:12+5:30
गेवराईत शिवाजीराव पंडित अभीष्टचिंतन सोहळा
- सखाराम शिंदे
गेवराई (जि. बीड) : सत्ता कधी असते, कधी नसते. पण सत्ता, पद गेले की काहींचा चेहरा पडतो. परंतु शिवाजीराव पंडित यांचे तसे नाही. त्यांनी बीड जिल्ह्यात अनेक पदे भोगली. ४० वर्षे जनतेला भरभरून दिले. सेवाभावी वृत्तीने काम केले. ही बीड जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. स्वत:हून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतरही ते शेतीत रमले. राजकारणात पंडित घराण्याचा मोठा वारसा आहे. यामुळे आगामी काळात त्यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.
गेवराई येथे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळा रविवारी (९ ऑक्टोबर) पार पडला. यावेळी शिवाजीराव पंडित यांचा खासदार शरद पवार, मंत्री रावसाहेब दानवे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. आज आनंदाने या सोहळ्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. बीडमध्ये १९८० मध्ये एखादी जागा सोडली तर माझ्या सर्व जागा निवडून आल्या होत्या. आज सुंदरराव सोळंके, गोविंदराव डक, बाबूराव आडसकर आपल्यात नाहीत. त्या काळात त्यांनी माझ्याबरोबर काम केले. या मंडळींनी राज्याच्या राजकारणात मला मनापासून साथ दिली. त्यात एक महत्त्वाची व्यक्ती शिवाजीराव पंडित हेही होते. १९८५ मध्ये शिवाजीराव पंडित यांच्यावर जिल्हा परिषदेची जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी पेलली. त्या काळात दुष्काळ होता. त्यात सर्वात आधी बीडचे नाव असायचे. दुष्काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत केली. जायकवाडीचे पाणी गेवराईला आणले, असे पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री संदीपान भुमरे, राजेश टोपे, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
एकदा ठरविले की बीडकर ते पूर्ण करतात
गेवराईत शिवाजीराव पंडित यांनी जयभवानी सहकारी साखर कारखाना उभा केला. शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. आजही शेतीतून काळ्या आईची सेवा करीत आहेत याचा मला आनंद आहे. बीडचे वैशिष्ट्य असे आहे की एकदा ठरविले की ती गोष्ट येथील लोक पूर्ण करतात, असेही शरद पवार म्हणाले.