लागेल आग, तेव्हा येईल जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:53+5:302021-04-14T04:30:53+5:30
बीड : भंडारा येथील घटनेची आग विझत नाही तोच नागपूरच्या कोविड केअर सेंटरला आग लागली. यात चार रुग्णांचा होरपळून ...
बीड : भंडारा येथील घटनेची आग विझत नाही तोच नागपूरच्या कोविड केअर सेंटरला आग लागली. यात चार रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या दोन घटना ताज्या असतानाही बीडमधील कोविड सेंटरची काळजी घेतली जात नाही. आतापर्यंत एकाही सेंटरचे फायर ऑडिट झालेले नसून, प्रशासनही याबाबत गाफील असल्याचे स्पष्ट होत आहे. आग लागल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूही वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये खाटा अपुऱ्या पडत असून, समान्य रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे खासगी कोविड सेंटरला प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात शासकीय २० व खासगी ३४ अशा ६४ संस्थांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. परंतु येथे नियमांची पूर्तताच होत नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच नागपूरच्या कोविड सेंटरमध्ये आग लागली. यात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर तरी प्रशासनाने बीड जिल्ह्यातील सर्व सेंटरला सूचना करून आगीबाबत काळजी घेण्यासह फायर ऑडिट करण्याचे आदेश देणे गरजेचे होते; परंतु अद्याप तसे काहीच झालेले नाही. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण जीव मुठीत धरून राहत आहेत. प्रशासनाने सरकारी व खासगी सेंटरचे फायर ऑडिट केले असेल तरच उपचारास परवानगी द्यावी, अन्यथा संंबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
इमारतींची पाहणी न करताच परवानगी
सध्या ऊठसूट कोणीही कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी परवानगी मागत आहेत. बीड शहरात तर गर्दी होत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाकडूनही तत्काळ परवानगी दिली जात आहे. परंतु हे करताना त्यांच्याकडे पूर्ण सुविधा आहेत का, इमारत कशी आहे, खाटा चांगल्या आहेत का, सुविधा आहेत का, आदींची पाहणीच केली जात नाही. त्यामुळेच सध्या खासगीमध्ये सामान्यांना लाखो रुपये देऊनही जनरल वॉर्डप्रमाणे उपचार घ्यावे लागत आहेत. याची तपासणी करण्याची मागणीही होत आहे.
पूर्वीच्या ऑडिटची अंमलबजावणीच नाही
भंडार घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वच शासकीय आरोग्य संस्थांचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात आले होते. फायर विभागाने ऑडिट करून त्रुटी दिल्या. परंतु अद्याप एकाही संस्थेत त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. जिल्हा रुग्णालयात तर आपत्कालीन मार्गही बंद असल्याचे दिसते.
कोट
एकाही खासगी रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले नाही. एकतर आमच्याकडून अथवा खासगी संस्थेकडून ऑडिट करणे अवश्यक असते. खासगी संस्थेकडून केले तरी त्याचा अहवाल आम्हाला देणे बंधनकारक आहे. भंडारा घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वच शासकीय आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट केले होते. त्याचा अहवालही दिलेला असून, १२० दिवसांची मुदत दिलेली आहे.
बी. ए. धायतडक, प्रमुख अग्निशमन विभाग न. प. बीड
---
कोरोनाबाधित व संशयितांवर उपचार करण्यासंदर्भात आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण आरोग्य संस्था ६४
शासकीय संस्था २०
खासगी संस्था ३४
--