रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:57+5:302021-04-29T04:25:57+5:30
बीड : अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच ...
बीड : अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, अद्याप अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप मात्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या धान्याचे वाटप लवकर करावे, अशी मागणी होत आहे.
कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. ही घोषणा करून जवळपास १५ दिवस होत आहेत; परंतु अद्याप धान्य वाटपासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान, मे महिन्यासाठी वाटप होणारे धान्य हेच मोफतचे धान्य असेल अशी शक्यता आहे. याचवेळी केंद्र शासनाकडूनदेखील मोफत धान्य वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र, केंद्राकडूनदेखील मोफत धान्य वाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन धान्य वाटप करावे. या मोफत धान्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. मात्र, या योजनेमधून एपीएल शेतकरी कुटुंबाला वगळण्यात आले असून, त्यांना ३ रुपये प्रति किलो तांदूळ व २ रुपये प्रति किलो गहू याप्रमाणे लाभ मिळणार आहे. त्या कुटुंबांची संख्या जवळपास ५ लाख ४० हाजार ५४७ एवढी आहे.
मोफत धान्य मिळणारे एकूण रेशनकार्डधारक कुटुंबाची संख्या- ३८९६५७
अंत्योदय -४०२८८
केशरी - ३४९३६९
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा ?
सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप धान्य मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. घोषणा केल्याप्रमाणे तत्काळ धान्य वाटप करावे.
-राजेश गालफाडे
दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासानाने घोषणा केली, मात्र, धान्याचे वाटप अद्याप सुरू झाले नाही. रेशन दुकानातून मोफत धान्य तात्काळ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन किती दिवस आहे यासंदर्भात मात्र काहीच माहिती नाही.
-रोहित काळे
गेल्या वर्षापासून काम मिळणेदेखील कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षीदेखील दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली होती. मात्र, आणखी हातचे काम गेले आहे. त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे धान्याचे वाटप तात्काळ करावे.
-राजू विद्यागर
मोफत धान्य काय मिळणार
रेशन दुकानावर अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २३ किलो गहू व १२ किलो तांदूळ तर, प्राधान्य कुटुंब योजना गटातील कार्डधारकांना २ किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार आहेत.
....
मोफत धान्याचे वाटप अनेक ठिकाणी सुरू झाले आहे. सर्व लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या आहेत. -नामदेव टिळेकर, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड.