जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ९०० मुले गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:20+5:302021-06-16T04:44:20+5:30

बीड : जिल्ह्यात दहावी प्रवेशित मुलांची संख्या पाहता ९०० ने कमी असून नववीपर्यंत फुगलेला हा आकडा दहावीत कसा कमी ...

Where did 900 ninth graders in the district go? | जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ९०० मुले गेले कुठे?

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ९०० मुले गेले कुठे?

Next

बीड : जिल्ह्यात दहावी प्रवेशित मुलांची संख्या पाहता ९०० ने कमी असून नववीपर्यंत फुगलेला हा आकडा दहावीत कसा कमी झाला, याबद्दल विविध शंका व्यक्त होत आहेत. पटावरील आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील दिसणारी तफावत कोरोनामुळे आहे की इतर कारणांमुळे हे समजणे अवघड झाले आहे. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थी इयत्ता नववीपर्यंत येतात. मात्र, दहावीच्या निकलावर परिणाम होऊ नये म्हणून परीक्षेचे अर्ज भरताना शाळेचे शिक्षक व संस्थाचालकांकडून सावध पाऊल टाकत होते. तर अनुदानासाठी तसेच पटसंख्या टिकविण्यासाठी नववीपर्यंत विद्यार्थी संख्या वाढती दिसते. मात्र, दहावीची परीक्षा देण्यासाठी भरावा लागणारा अर्ज, द्यावे लागणाऱ्या कागदपत्रांमुळे शाळांपुढेही पेच असतो.

मात्र, सर्व संस्थांमध्ये असे होत नाही. काही संस्था प्रामाणिकपणे वस्तुस्थितीदर्शक आणि आवश्यक माहिती उपलब्ध करतात. तर अनेक शाळा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाला कळवीत नाहीत. तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडे देखील ही तफावत शोधण्याची व्यवस्था नाही. मागील वर्षीपासून शासनाने केलेल्या काही नियमांमुळे मात्र नववीपर्यंत फुगणारे आकडे कमी होत आहेत. तरीही नववीतील ९०० मुले गेले कुठे? असा प्रश्न कायम आहे.

-------

बीड जिल्ह्यात नववी वर्गातील विद्यार्थी संख्या ४९ हजार ८९० होती. तर दहावीत प्रविष्ट होणारी संख्या ४८ हजार ९८३ इतकी आहे.

------------

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर....

आई-वडिलांना मुलीचे ओझे कमी करायचे असते. त्यामुळे तिचे हात पिवळे करायची घाई असते. त्यामुळे कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करीत बालविवाह करण्याकडे काही पालकांचा ओढा असतो. मात्र, असे विवाह समाजपटलावर लक्षात येत नाहीत. तसेच शिकण्यापेक्षा मुलगी, मुलगा आपल्या हाताखाली कामाला येतील, अशी अपेक्षा पालक ठेवतात. आर्थिक अडचणींमुळे रोजगारासाठी कामे शोधतात. यासाठी स्थलांतरही करावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्येत ही तफावत आढळू शकते, असे प्रा. मुकुंद देशमुख म्हणाले.

--------

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीच्या वर्गात दाखल झालेला विद्यार्थी मधल्या काळात शाळाबाह्य झाला तरी पटावर त्याचे नाव तसेच ठेवले जाते. शाळेतील पदानुसार अनुदान मिळते. कमी पटसंख्या दाखविली तर पदे निष्कासित होण्याची भीती असते.

विद्यार्थी एकच; परंतु त्याचे नाव दोन शाळांमध्ये नोंदलेले असते. यातून पट टिकविण्याचा प्रयत्न केला जातो. नववीपर्यंत अनेक मुले, मुली विविध कारणांमुळे शाळांपासून दूर राहिली तरी त्यांची नावे दिसतात. त्यामुळे वाढलेल्या विद्यार्थी संख्येचा आभासीपणाचा फुगा मात्र दहावीत फुटतोच.

आता शासनाच्या निर्देशानुसार पटावरील विद्यार्थी आणि त्यांचे आधार क्रमांक जाेडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेमके किती विद्यार्थी खरे, हे स्पष्ट होणार आहे.

------------

नववी आणि दहावीच्या विद्यार्थी संख्येत येणाऱ्या तफावतीबद्दल विचारणा केली असता, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. तसेच मागील वर्ष कोरोना व त्याआधीचे एक वर्ष अशा दोन वर्षांपासून तपासणीच झालेली नसल्याची बाबही पुढे आली आहे. विद्यार्थी संख्या फुगविणाऱ्या शाळांची तपासणी करण्याकडे शिक्षण विभागाची उदासीनता दिसून आली आहे.

------------

Web Title: Where did 900 ninth graders in the district go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.