गतवर्षीच्या लाॅकडाऊनमधील मदतीचे हात गेलेत कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:46+5:302021-03-28T04:31:46+5:30
सखाराम शिंदे गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी संपूर्ण देशात लाॅकडाऊन लावला होता. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य ...
सखाराम शिंदे
गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी संपूर्ण देशात लाॅकडाऊन लावला होता. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य कामगार व इतरांना काम नसल्याने खायची पंचायत झाली होती. त्यामुळे शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षाने तब्बल तीन महिने नागरिकांना घरपोहोच खाण्याची व्यवस्था व किराणा कीटसह विविध प्रकारे मदतीचा ओघ सुरू ठेवला होता. यावर्षी मदतीचे हे हात आता कुठे दिसत नाहीत.
आता पुन्हा जिल्ह्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन सुरू झाला. दुसरा दिवस उजाडला तरी अजून शहरातील सामाजिक व राजकीय पक्षाने कसलीच मदतीची व खाण्याची सोयदेखील केली नसल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात कडक लाॅकडाऊन लावण्यात आल्याने सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. यात हातावर पोट भरणाऱ्या रोजंदारी मजूर, रिक्षाचालक, वडापाव, फळविक्रेत्यांसह अनेकांची कामे बंद झाल्याने व हाताला काम नसल्याने एकवेळची खायची पंचायत झाली होती. अशा वेळेला माजी आ.अमरसिंह पंडित याच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठानने शहरातील व ग्रामीण भागात महिनाभर पुरेल एवढ्या किराणा मालाच्या किटचे हजारो कुटुंबाला घरपोहोच वाटप केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक व्हेंटिलेटर दिले होते. तसेच संदीप मुळे व मित्र परिवाराने तीन महिने शहरातील विविध भागांत राहणाऱ्या गरीब कुटुंबाला घरपोहोच खिचडीचे वाटप केले.
संदीप पाडुळे, शिवस्वराज्य प्रतिष्ठान, शाहिनबग यांनी घरी जाऊन जेवणाची सोय केली होती. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अक्षय पवार याच्या वतीने सॅनिटाझर, मास्क व किराणा किटचे आदी मदतीचे वाटप केले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनीदेखील किराणा किटचे वाटप केले होते. तसेच युवक काँग्रेसचे श्रीनिवास बेदरे, बाळासाहेब सानप यांनीदेखील मदत केली, तर काहींनी मुक्या जनावरांच्या चाऱ्यांची सोय केली होती. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबाला या सर्वांमुळे आधार मिळाला होता. मात्र आता पुन्हा जिल्ह्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन लावण्यात आला व दुसरा दिवस उजाडला तरी शहरातील व तालुक्यातील अनेक हातांवर पोट असणाऱ्यांचे कामे बंद झाली असल्याने आता खायचे काय? असा प्रश्न या कुटुंबावर येऊन ठेपला. असे असतानाही शहरातील व तालुक्यातील एकही राजकीय पक्षाचे वा सामाजिक संघटनेचे कोणीही अजून तरी पुढे आले नाहीत. सामाजिक संघटनांनी व राजकीय नेत्यांनी तसेच कार्यकत्यांनी पुढे येऊन गरीब कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी सर्व सामान्यांमधून होत आहे.
===Photopath===
270321\20200401_174644_14.jpg
===Caption===
गेल्या वर्षीचे लॉडाऊनमध्ये गेवराईत संदिप मुळे यांच्या वतीने खिचडी वाटप झाले होते.